ऋतुराज गायकवाडची त्याच्या 100 व्या लिस्ट ए सामन्यात शतकी खेळी, श्रीलंका अ विरुद्ध तिलकचीही फिफ्टी
श्रीलंका अ संघाविरुद्ध वनडे तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात भारत अ संघाचा उपकर्णधार ऋतुराज गायकडवाडने आज (मंगळवार, ९ जून) धमाकेदार शतक झळकावले आहे. त्याने ११२ चेंडूंमध्येच शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने आपल्या १०० व्या लिस्ट ए सामन्यात शतक केले. दंबुलामध्ये सुरू असलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली.
या सामन्यात भारताची सुरूवात अडखळत झाली. आयपीएल २०२६ मध्ये लक्षवेधी कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी १२ चेंडूंत १४ धावा करत बाद झाला. त्याच्या पाठोपाठ प्रभसिमरन सिंगही (२) विकेट गमावून बसला. त्यामुळे संघाची स्थिती १६ धावांवर २ विकेट अशी झाली. त्यानंतर प्रियांश आर्य आणि ऋतुराज यांच्यात ५३ धावांची भागीदारी झाल्याने संघाच्या डावात थोडे स्थैर्य आले, मात्र प्रियांश ३२ धावा करत धावबाद झाला.
ऋतुराजने श्रीलंका अ विरुद्ध ११२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. ६ चौकार आणि ३ षटाकरांच्या जोरावर त्याने हे २१ वे लिस्ट ए शतक झळकावले. तो ११३ चेंडूंमध्ये १०१ धावा करत बाद झाला. तत्पूर्वी त्याने तिलकसोबत चौथ्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी केली. तिलक ६० धावा करत बाद झाला. आयुष बडोनीने १८ चेंडूंत २४ धावा केल्या. तसेच सुर्यांश शेडगे २६ धावा (१४) आणि पदार्पण केलेला अनुकूल रॉय १ धाव करत नाबाद राहिले. भारताने ५० षटकांत ६ विकेट्स गमावत २७७ धावा केल्या.
वैभवची विकेट वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराजने घेतली. त्याने तिलक वर्मालाही बोल्ड केले. त्याने ९ षटकांत ६७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. वनुजा सहानने १० षटकांत ३५ धावा दिल्या, मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.
या तिरंगी मालिकेत भारताचा पुढील सामना अफगाणिस्तान अ संघाविरुद्ध असून तो ११ जून रोजी खेळला जाणार आहे.
Comments are closed.