सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल हत्या, वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार करुन संपवलं


सांगली हत्येची बातमी सांगलीत दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवशीच हत्या केल्याने सांगलीत खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांची हत्या करण्यासाठी आलेल्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही जमावाने हल्ला झाल्याने तोही ठार झाला. एकाचवेळी दोघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, सांगली गारपीर चौकात वाढदिवस साजरा करीत असलेल्या दलित महासंघाच्या उत्तम मोहितेचा गुप्तीने सपासप वार करून खून करण्यात आला . त्यानंतर वार करणाऱ्या शाहरुख शेखचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला. या ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल हत्येची सध्या राज्यभरात चर्चा रंगली आहे. (Sangli Marathi News)

Sangli Crime news: नेमकं काय घडलं?

उत्तम मोहिते यांचा काल मंगळवारी वाढदिवस होता. यासाठी त्यांच्या घराजवळच वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी घराजवळ मांडवही घालण्यात आला होता. याठिकाणी सांगली शहरातील मान्यवर उत्तम मोहिते यांची भेट घेण्यासाठी येत होते. रात्री 12 वाजता शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख हा त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह त्याठिकाणी आला होता. या सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला. यानंतर मोहिते याला शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने टोळके गेले आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने पोटात आणि मानेवर वार केले.  यामध्ये हल्लेखोरांनी गुप्तीने केलेले सपासप वार उत्तम मोहिते यांच्या वर्मी लागले आणि त्यांचा मृत्यू झाला.

गुप्तीने अनेक वार झाल्यामुळे उत्तम मोहिते रक्तबंबाळ होऊ खाली पडले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर यावेळी उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी प्रतिकार केला. तेव्हा एक वार शाहरुख शेख याच्या पायावर बसला. त्यामुळे त्याच्या पायातून प्रचंड रक्तस्राव सुरु झाला. यानंतर उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी शाहरुख शेख आणि त्याच्या साथीदारांवर प्रतिहल्ला चढवला. यावेळी जमावाने शाहरुख शेख याला पकडून बेदम मारहाण केली. या धक्कादायक घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते. खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला. समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती. परंतु याबाबत शहर पोलिस ठाण्यात मध्यरात्री पर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता.

आणखी वाचा

विवाहित मैत्रिणीचा गळा आवळून खून, कृष्णा नदीत फेकला मृतदेह; ईश्वरपूरमधील धक्कादायक घटना

आणखी वाचा

Comments are closed.