भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, गुन्हा करायचा, पक्षात जायचं अन् आमदार, खासदार, मंत्री व्हायचं; संजय राऊत यांची टीका
राज्यातील सरकार आणि सत्ताधारी माजलेत. विधिमंडळाच्या आवारामध्ये काल ज्या घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला. याला राज्यातील सरकार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र मोदी यांची धोरणे कारणीभूत आहेत. सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यांना ताकद, संरक्षण दिले जात आहे. वाशिंग मशीनमध्ये टाकून साफ केले जातेय, त्यामुळे गुन्हेगारांची हिंमत वाढली. त्यामुळेच विधानसभेच्या दरवाजात गँगवॉर झाले, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली.
सगळेच आमदार माजलेत असं लोकांना वाटतं, असे हतबल उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले होते. याबाबत माध्यमांनी विचारले असता संजय राऊत म्हणाले की, गुन्हेगारांची भरती थांबवली की हा माज आपोआप उतरेल. त्यासाठी कायद्याची गरज नाही. आमच्या पक्षात यापुढे कोणत्याही गुन्हेगाराला प्रवेश मिळणार नाही, कोणत्याही गुन्हेगाराला राजकीय संरक्षण मिळणार नाही, कोणत्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये टाकून, धुवून आमच्या पक्षामध्ये वाळत टाकणार नाही असा जीआर काढाल. हे जाहीर केले तर विधिमंडळाच्या आवारात अशा घटना घडणार नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जे अध:पतन सुरू आहे त्याला भाजपची धोरणे कारणीभूत आहेत.
उद्या जर दाऊन इब्राहिम मुंबईत आला, इतके वर्ष हा हिंदुस्थानात नव्हता, त्याच्यावर नवीन गुन्हेच नाही असे म्हणत त्यालाही हे पक्षात घेतली. नाशिकमध्ये जसे गुन्हे मागे घेतले गेले तसे त्याच्यावरचे गुन्हे मागे घेतील. नाशिकमध्ये पक्षात प्रवेश करायचा म्हणून संबंधित व्यक्तींवरचे गुन्हे मागे घेतले, तसेच दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन यांच्यावरचे गुन्हे मागे घेतले जातील आणि त्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. कारण त्यांना आमच्यासारख्या विरोधकांना कायदेशीर किंवा लोकशाही मार्गाने नाही, तर बळाचा, शस्त्राचा वापर करून संपवायचे आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, विधान भवनामध्ये त्यांना एका आमदाराची हत्याच करायची होती. मोक्काचे, खुनाचे आरोपी विधानभवनात आले. विधिमंडळाच्या, सभागृहाच्या दारात उभे राहून मारामारी करताहेत. हे सगळे आरोपी भाजप आमदाराशी संबंधित आहेत. तुमच्या आमदाराची एवढी हिंमत कशी वाढते? कारण त्याच्यावरसुद्धा अशाच प्रकारचे खटले आहेत.
गुन्हेगारांची भरती केल्यामुळे भाजप हे गुन्हेगारांचे आश्रयस्थान झाले आहे. गुन्हा करायचा, त्यांच्या पक्षात जायचं, आमदार, नगरसेवक, खासदार, मंत्री व्हायचे किंवा संरक्षण घ्यायचे ही या राज्याची स्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या तुम्ही कोणत्या गप्पा करताय, अशा शब्दात राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.
Comments are closed.