महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी पालिकेने भरली नाही तर शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणाने दिला होता. याची गंभीर दखल पालिकेने चालू बिल व थकबाकी 15 कोटी यापैकी 1 कोटी 36 लाख 94 हजार 871 रुपये प्राधिकरणाकडे जमा केले आहेत. त्यामुळे सध्यातरी महाबळेश्वर शहरावरील पाणीपुरवठ्याचे संकट तात्पुरते टळले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून महाबळेश्वर पालिकेला पाणीपुरवठा केला जातो. याबाबत जीवन प्राधिकरणाकडून दरमहा पाणीपुरवठ्याचे बिल दिले जाते. पालिकेकडून ते बिल वेळेवर अदा केले जात नसल्याने पालिकेकडील थकबाकी वाढत जाते. सध्या ही थकबाकी 15 कोटी 3 लाख 27 हजार 381 इतकी आहे. वारंवार थकबाकी भरण्याबाबत जीवन प्राधिकरणाकडून पालिकेला कळविले जाते. मात्र, पालिका अशा नोटिसांची दखल घेत नसल्याने काहीवेळा जीवन प्राधिकरणाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद केला जातो. मागील महिन्यात अशा प्रकारे वारंवार पाणीपुरवठा खंडित करण्यात आल्याने शहरात जीवन प्राधिकरणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

अशातच जीवन प्राधिकरणाने पालिकेला निर्वाणीचा इशारा म्हणून सोमवारी मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत पालिकेने एप्रिल 2024 पासून ते फेब्रुवारी अखेरपर्यंत जीवन प्राधिकरणाच्या चालू बिलांची सर्व थकबाकी असलेली रक्कम 1 कोटी 36 लाख 94 हजार 871 रुपये जमा केली आहे. पालिकेचे प्रशासक योगेश पाटील यांनी शहराचा पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी तातडीने हालचाली करून जीवन प्राधिकरणाच्या थकबाकीतील काही रक्कम जमा केल्याने शहरावरील पाणीपुरवठा खंडित होण्याचे संकट तात्पुरते टळले आहे.

पालिकेच्या मागणीला ‘केराची टोपली’

जीवन प्राधिकरण महाराष्ट्रात सर्वत्र पाणीपुरवठ्याच्या योजना राबवते. राज्यातील इतर पाणीपुरवठा योजनांचा दरहजारी पाण्याचा दर पाहता महाबळेश्वर पालिकेला सर्वाधिक दर आकारला जातो. ही तफावत दूर करण्याची मागणी महाबळेश्वर पालिकेने अनेकदा केली आहे. मात्र, जीवन प्राधिकरणाकडून पालिकेच्या या मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

जीवन प्राधिकरणाने पालिकेवर 2008 पासूनच्या थकबाकीसाठी तगादा लावला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांची सन 2008 पासून आज अखेरची थकबाकी.

मुद्दल थकीत रक्कम 6,72,41,518/-
विलंब आकार रक्कम 8,01,56,669/-
एकूण थकीत रक्कम 15,03,27,381/-

Comments are closed.