शांताराम बापूंचा जीवनपट मोठ्या पडद्यावर; हिंदीत भव्यदिव्य सिनेमाची निर्मिती, सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत

हिंदुस्थानच्या सिनेसृष्टीचा किमयागार, सामाजिक- आशयघन कलाकृती निर्माण करून नवा आदर्श निर्माण केला, असे प्रतिभावंत दिग्दर्शक-निर्माता व्ही. शांताराम यांची देदीप्यमान जीवनगाथा मोठय़ा पडद्यावर येत आहे. ‘व्ही शांताराम – द रेबेल ऑफ इंडियन सिनेमा’ हा भव्यदिव्य बायोपिक येत आहे. सिनेमाचे पहिले पोस्टर आज प्रदर्शित झाले. सिद्धांत चतुर्वेदी हा व्ही. शांताराम यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटाचे राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे निर्माते आहेत.
व्ही. शांताराम म्हणजे प्रयोगशील दिग्दर्शक. सामाजिक – आशयघन सिनेमांचा निर्माता. पुंकू, माणूस, डॉ. कोटणीस की अमर कहानी, अमर भूपाली, पिंजरा, दो आँखे बारह हाथ, नवरंग, झनक झनक पायल बाजे अशा व्ही. शांताराम यांच्या अनेक कलाकृतींनी सिनेसृष्टीला नवी दिशा दिली आहे.
व्ही. शांताराम हे नाव उच्चारताना हिंदुस्थानी चित्रपटाची संपूर्ण तत्त्वज्ञानपर परंपरा डोळ्यांसमोर उभी राहते. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची निष्ठा, प्रयोगांची भीती न बाळगता कलाप्रवाहात झेप घेण्याची त्यांची हिंमत हे सर्व पडद्यावर साकारताना एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती मिळाली. या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, हाच आमचा प्रयत्न आहे.
– अभिजीत देशपांडे, दिग्दर्शक

Comments are closed.