FPI चा टाटा बाय बाय, जुलै महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 5524 कोटी रुपये काढून घेतले

नवी दिल्ली : भारतीय शेअर बाजारातून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जुलै महिन्यात 5,524 कोटी रुपये काढून घेतले आहेत. अमेरिका-भारत यांच्यातील व्यापार करार अजून झालेला नाही यामुळं निर्माण झालेला तणाव आणि भारतीय कंपन्यांचे पहिल्या तिमाहीतील निकाल संमिश्र आल्यानं विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी विक्री सुरु केली. गेल्या तीन महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार खरेदी करत होते. आता त्याच गुंतवणूकदारांनी विक्री सुरु  केली आहे. डिपॉजिटरीच्या आकडेवारीनुसार  2025 मध्ये आतापर्यंत एकूण 83,245 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

मॉर्निंगस्टार इन्वेस्टमेंट रिसर्च इंडियाचे असोसिएटचे संचालक आणि संशोधन प्रबंधक हिमांशू श्रीवास्तव यांनी म्हटलं की विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा प्रवाह अमेरिका आणि भारत व्यापार करार आणि कंपन्यांचे निकाल यावर ठरेल. जर, व्यापारी वादाची समस्या सुटल्यास आणि कंपन्यांच्या कमाईथ सुधारणा झाल्यास गुंतवणूकदारांचा विश्वास वाढू शकतो. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 18 जुलै पर्यंत 5524 कोटी रुपयांची विक्री करुन गुंतवणूक काढून घेतली आहे.

विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी  जून महिन्यात 14590 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मे महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी  19860 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. एप्रिलमध्ये गुंतवणुकीची रक्कम 4223 कोटी रुपये होती. त्यापूर्वी मार्च महिन्यात विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 3973 कोटी रुपयांची विक्री केली होती. फेब्रुवारीत 34574 कोटी रुपयांची विक्री केली होती. जानेवारीमध्ये सर्वाधिक 78027 कोटी रुपयांची विक्री विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी केली होती. एप्रिलपासून विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी खरेदी सुरु केली होती. तीन महिन्यानंतर जुलैमध्ये त्यांनी विक्री सुरु केली.

एंजल वनचे वरिष्ठ विश्लेषक वकार जावेद खान यांनी देखील जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम यासह भारतातील कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीचा हंगाम या मुळं विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार पैसे काढून घेत आहे, असं म्हटलं.

दरम्यान, भारतीय शेअर बाजारात उद्याचा दिवस महत्तवाचा ठरणार आहे. अनेक कंपन्यांनी तिमाहीचे निकाल जाहीर केले असून त्याची प्रतिक्रिया गुंतवणूकदारांकडून कशी येते ते पाहावं लागणार आहे.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.