वाटद एमआयडीसी विरोधी आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा; एक इंचही जमीन देणार नाही, जिल्हा संपर्कप्रमुखांचा इशारा

वाटद एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची एक इंच जरी जमीन घेतली तर मी आडवा उभा राहीन. तुम्ही उद्योगमंत्री,पालकमंत्री असलात तर मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाचा डाव हाणून पाडू, असा इशारा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी दिला आहे. ते शनिवारी वाटद एमआयडीसीच्या विरोधात आयोजित जनसंवाद सभेत बोलत होते. यावेळी वाटद एमआयडीसी विरोधातील आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर म्हणाले की,आंदोलनाचे नेते प्रथमेश गवाणकर माझ्या घरी दोन वेळा आले त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी विनंती केली म्हणून मी आज येथे आलो आहे. आता तुम्ही एकटे नाही आहात हा तुमच्या समाजाचा सहदेव बेटकर तुमच्या सोबत आहे. तुमची जमीन घेण्याचा कुणी प्रयत्न केला तर मी आडवा उभा राहीन. हे उद्योगमंत्री आमच्या पक्षात होते तेव्हा वाटद एमआयडीसीबाबत त्यांची भूमिका वेगळी होती. आता मिंद्येगटात गेल्यावर त्यांची भूमिका कशी काय बदलली? असा सवाल बेटकर यांनी उपस्थित केला.
रामदास कदमांना बेटकरांचा इशारा
संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांनी रामदास कदम यांचा समाचार घेतला.रामदास कदम म्हणतात कुणबी समाजाचा माणूस विधानसभेत जाऊन नांगर धरणार काय? आम्ही नांगर विधानसभेत धरायचा की शेतात हे दाखवून देऊ असा इशारा सहदेव बेटकर यांनी दिला.
आंदोलनाला वाघाचं बळ
वाटद एमआयडीसी विरोधातील आंदोलनाला शिवसेनेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पाठिंबा दिला. पाठिंब्याचे पत्रक असीम सरोदे आणि प्रथमेश गवाणकर यांना सुपुर्द करण्यात आले.यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर,जिल्हा समन्वयक संजय पुनसकर,तालुकाप्रमुख शेखर घोसाळे,शहरप्रमुख प्रशांत सांळुखे,उपतालुकाप्रमुख प्रकाश साळवी,महेंद्र चव्हाण,विभागप्रमुख किरण तोडणकर,अमित खडसोडे,सुभाष रहाटे,मयुरेश पाटील,माजी नगरसेवक सलील डाफळे उपस्थित होते.
Comments are closed.