गंगेत कितीही डुबक्या घेतल्या तरी गद्दारीचा शिक्का आणि पाप जाणार नाही; उद्धव ठाकरे यांनी सुनावले

मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या उद्धारासाठी अखंडपणे झटणाऱ्या शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून गुरुवारी भव्य मराठी भाषा दिन सोहळा आयोजित करण्यात आला. न्यू मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात या सांस्कृतिक सोहळय़ात मराठीचा जागर करण्यात आला. या सोहळ्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या अखंड पाठपुराव्यानंतर मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर हा सोहळा होत असल्यामुळे याचे आकर्षण होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेबाबत परखड मत व्यक्त केले. महाराष्ट्र मुक्ती संग्रामाशी संबंध नसलेल्यांच्या हातात राज्य आहे. हे दुर्दैव आहे. एकेकाळी दिल्लीला धडकी भरवणारा मराठी बाणा दिसत नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी त्यांनी मराठीशी आणि महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांचाही चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्राशी गद्दारी करायची आणि गंगेत डुबक्या घ्यायच्या. कतीही डुबक्या घेतल्या तरी गद्दारीचा शिक्का आणि त्यांचे पाप जाणार नाही. एकमेकांना नमस्कार करताना आपण रामराम करायचो, त्याचे श्रीराम कधीपासून म्हणायला लागलो, याचा विचारही करण्याची गरज आहे. आपले राज्यगीत शमीमा अख्तर यांनी गायले. हे गीत तिने बटेंगें तो कटेंगे वाल्यांसमोर म्हटले. त्यावेळी त्यांची अवस्था केविलवाणी झाली होती, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

ही मुंबई आंदण म्हणून मिळालेली नाही. ही मुंबई रक्त सांडून, बलिदानाने मिळवलेली आहे. ज्यांच्या स्वातंत्र्यलढ्याशी संबंध नाही, त्यांच्या हाती देश गेला आहे. तसेच संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी ज्यांचा संबंध नाही, त्यांच्या हातात राज्य आहे, हे आपले दुर्दैव आहे. त्या काळी शाहीर अमर शेख यांनी दिल्ली गाजवली होती. दो कवडीके मोल मराठा बिकनेको तय्यार नही, अशा त्यांच्या गाण्यातील ओळी होत्या. ते आपले मराठी सत्व कुठे गेले. आज सर्व विकाऊ झाले आहेत. मराठी रंगभूमीची वाटचाल, इतिहास सांगणारे दालन आपण करणारच आहोत. त्याचे सर्व आदेशही निघाले आहेत. आता या सरकारने ते रद्द करून लाडक्या कंत्राटदाराला कंत्राट देण्याचा घाट घातला आहे, असेही ते म्हणाले.

दुबईला जाऊन हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट मॅच बघाणारे आम्हाला बाळासाहेबांचे विचार सांगत आहेत. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही, ते गावाला जाऊन बसतात. ते आम्हाला विचार सांगत आहेत. दालन नाही झाले तरी चालेल पण कंत्राटदार आला पाहिजे, हे यांचे धोरण आहे. तिथे आम्ही उपऱ्यांना घुसू देणार नाही. तिथे एकही वीट रचण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही ते उखडून फेकणार, असा निर्धार आपण करायला हवा. मराठी भाषेच्या अभिमानाबाबतही त्यांनी सांगितले.

परभाषेतही व्हा पारंगत, ज्ञानसाधना करा तरी
मायमराठी मते इथे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे
गुलाम भाषिक होऊन आपुल्या प्रगतीचे शीर कापू नका

या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींचीही त्यांनी आठवण करून दिली. आपल्या भाषेत काहीही कमी नाही, त्याचा अभिमान बाळगा. आपल्या भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात त्यांनी किती टाळाटाळ केली. तसेच निवडणुकीच्या तोंडावर याची घोषणा केली. हे सर्व जनतेला माहिती आहे. आता आपल्या जगण्यातून आपण मराठी आहोत, हे जाणवून दिले पाहिजे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, असे मराठी माणसाने जगण्याची गरज आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.