निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
हिंगोली : शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोलीत मतदान करत असताना गोपनीयतेचा भंग केला आहे. याशिवाय मतदान केंद्रामध्ये मोबाईल नेत घोषणाबाजी केल्याचा व्हिडिओ समोर आला. हिंगोली नगरपालिकेसाठी शिवसेना आमदार संतोष बांगर हे मतदान करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कन्या शाळा मंगळवारा या ठिकाणी मतदान केंद्रावर गेले होते. संतोष बांगर यांनी मतदान कक्षात जाऊन त्यांनी एका महिलेला मतदान चिन्ह सांगून गोपनीयतेचा भंग केला. त्याचबरोबर घोषणा दिल्या म्हणून संतोष बांगर यांच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुरुवातीपासून एबीपी माझा ने ही बातमी लावून धरली होती या बातमीचा मोठा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी निवडणूक आयोगाने संतोष बांगर यांची आमदारकी रद्द केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी : संदेश देशमुख
संतोष बांगर यांनी आज मतदान केंद्रामध्ये जात गोपनीयतेचा भंग केला. यावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बांगर यांनी हिंगोली जिल्ह्याचा बिहार करून ठेवला आहे. निवडणूक आयोग जिवंत असेल तर बांगर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केली आहे.
आमदार संतोष बांगर यांनी गोपनीयतेचा नाहीतर आचारसंहितेचा भंग केला आहे. दंडुकेशाही दडपशाहीच्या माध्यमातून हातात मोबाईल घेऊन घोषणा देत आहेत. मतदारांना या निशाणीवर मतदान करण्याचं सांगत आहेत त्यामुळं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे, अशी मागणी संदेश देशमुख यांनी केली.
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कार्यवाही करेल. बूथ वरील सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे आणि पोलिसांना देखील निलंबित केलं पाहिजे, अशी मागणी संदेश देशमुख यांनी केली.
एकनाथ शिंदे यांचं संतोष बांगर यांना समर्थन आहे का? असा सवाल देखील देशमुख यांनी केला. संतोष बांगर यांनी हिंगोलीची परिस्थिती बिहार पेक्षा ही वाईट करून ठेवलेली आहे, अशी टीका देखील संदेश देशमुख यांनी केली.
दरम्यान, हिंगोलीत साडेपाच वाजल्यानंतर मतदानाची वेळ संपली असून मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांच्या रांगा पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.