श्रेयसचे कमबॅक लांबणीवर

हिंदुस्थानचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरची दुखापत लवकर बरी होण्याची शक्यता कमी असल्यामुळे त्यांचे संघातील पुनरागमन लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे येत्या 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वन डेमध्ये झेल घेताना पडल्याने त्याच्या बरगडय़ांना गंभीर दुखापत झाली आणि त्याला सिडनीत रुग्णालयात दाखल करावे लागले होते. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, त्यावेळी श्रेयसचा ऑक्सिजन स्तर 50 पर्यंत खाली आला होता आणि तो काही मिनिटे उभाही राहू शकला नाही. सध्या तो सिडनीत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे आणि पूर्णपणे बरा होण्यासाठी किमान एक महिना लागेल, असे डॉक्टरांचे मत आहे.

मी दररोज बरा होतोय

स्वतः श्रेयसनेही सोशल मीडियावर लिहिले की, ‘मी दररोज थोडा बरा होत आहे. सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.’ 30 वर्षीय अय्यरच्या कारकीर्दीत गेल्या काही वर्षांत दुखापतींमुळे वारंवार खंड पडले आहेत. याआधीही त्याने पाठीच्या त्रासामुळे कसोटी  क्रिकेटमधून विश्रांती घेतली होती.

Comments are closed.