चंद्रपूरमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी नदीवर आंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले, एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा समावेश

चंद्रपूर जिह्यात महाशिवरात्रीनिमित्त नदीवर आंघोळीसाठी गेलेले सहाजण नदीमध्ये बुडाल्याचा दुर्दैवी प्रसंग घडला. वैनगंगा नदीत तीन सख्ख्या बहिणी बुडाल्या. तर दुसऱ्या एका घटनेत वर्धा नदीत आंघोळीसाठी गेलेले तीन युवक बुडाले.

महाशिवरात्री असल्याने अनेक भाविक नदीपात्रात आंघोळीसाठी जातात. चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे परिवारातील आठ जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेले होते. पात्रात उतरल्यावर कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल या सख्ख्या बहिणी पाण्याचा अंदाज न आल्याने खोलात गेल्या. पोहता येत नसल्याने त्या बुडाल्या. यापैकी एकीचे प्रेत मिळाले असून दोघींचा शोध सुरू आहे.

दुसऱ्या एका घटनेत राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील तीन युवक वर्धा नदीत बुडाले. तुषार आत्राम, मंगेश चणकापुरे, अनिकेत कोडापे अशी बुडालेल्या युवकांची नावे आहेत. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

खडक हाताला लागल्याने दोघे बचावले

वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेला एक मुलगा आणि महिलाही पाण्याच्या प्रवाहात अडकले. त्यांनी खूप आरडाओरडा केला, मात्र मदतीला कुणीही नव्हते. त्या दोघांच्या हाताला नदीपात्रातील खडक लागल्याने त्याला ते पकडून राहिले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना वाचवले.

Comments are closed.