मतिमंद महिलेला दुचाकीवरून पंढरपुरात आणलं, डिझेल, शेगडी घेतली अन्..,CCTVमुळं गुढ उलगडलं

सोलापूर गुन्हा: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात विवाहितेच्या जळलेल्या मृतदेहाच्या घटनेनंतर संपूर्ण जिल्हा हादरला. विवाहितेने प्रेमासाठी प्रियकराचा मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा थरारक प्रकार मंगळवेढ्यातून समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांचे अनेक खुलासे समोर आल्यानंतर आता या खून प्रकरणाचं गुढ उकललं आहे . (crime news)

हिंदी सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक घटना मंगळवेढा घडली. एका विवाहितेचा जळलेल्या अवस्थेतील मृतदेह घरासमोरील गवताच्या गंजीत सापडल्याने घरातील विवाहित सुनेनेच आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटले . दरम्यान, स्वतःचे अनैतिक संबंध लपवण्यासाठी प्रियकरांनी जाळलेल्या महिलेबाबत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे .

प्रेमसंबंध लपवण्यासाठी खूनाचा विकृत प्लॅन

आरोपी निशांत ने मतिमंद महिलेला पंढरपूर मधून आणून तिचा गळा दाबून खून केला .नंतर पडक्या घरात दोन दिवस महिलेचा मृतदेह लपवून ठेवला .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता सदर जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या महिलेला 11 जुलै रोजी निशांत ने दुचाकीवरून पंढरपूर येथे आणल्याचा सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे .ही महिला पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे .महिलेचा फोटो दाखवून नातेवाईकांना ओळख पटवणे शक्य होईल असंही पोलिसांनी सांगितलं आहे .

निशांत सावंत आणि किरण या दोघांचे प्रेमसंबंध होते. कुटुंबाला याचा सुगावा लागू नये म्हणून त्यांनी एक विचित्र योजना आखली. ती म्हणजे किरणने आत्महत्या केल्याचा बनाव उभा करायचा आणि प्रत्यक्षात कोणीतरी अनोळखी महिलेचा खून करून तिचा मृतदेह जाळायचा.

मतिमंद महिलेला पंढरपूरहून आणून केली निर्घृण हत्या

या योजनेनुसार, निशांतने पंढरपूरमधून एका मतिमंद महिलेला दुचाकीवरून आणलं. त्या महिलेला एका पडक्या घरात नेऊन तिने तिचा गळा दाबून खून केला. मृतदेह दोन दिवस तिथंच लपवून ठेवला. नंतर चादरीत गुंडाळून तो मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजीत टाकून पेटवून दिला. यावेळी खून लपवण्यासाठी किरणने आत्महत्या केली, असा बनाव रचण्यात आला. पोलिसांनी सुरुवातीला आत्महत्येचा संशय घेतला, पण तपास सुरू केल्यावर सत्य हळूहळू समोर येऊ लागलं. पोलिसांनी किरण आणि निशांत यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यातून त्यांचे संबंध स्पष्ट झाले.

दुचाकीवरून महिलेचचं अपहरण, 2000 देऊन डिझेल घेतलं अन् ..

निशांतने 11 जुलै रोजी दुचाकीवरून पंढरपूरहून एका महिलेचा अपहरण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. यानंतर त्याने दोन हजार रुपये देऊन डिझेल घेतलं आणि मंगळवेढ्यातून नवीन गॅस सिलिंडर व शेगडी विकत घेतली. मृतदेह जाळण्यासाठी याचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे . जळालेल्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी गावागावांत चौकशी सुरू केली. अखेर त्या महिलेबाबतची माहिती समोर आली असून ती पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर गावातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. या क्रूर घटनेमुळे पाटकळ गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.