शेअर बाजाराची बुल रन सुरू की नफा वसूली? जाणून घ्या तज्ज्ञांची मते…

गेल्या आठवड्याच दबावात असलेला शेअर बाजार या आठवड्यात मंगळवारपासून तेजीत आला आहे. मंगळवारी बिहार विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. त्यामुळे बाजारात तेजी आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता बाजार तेजीत असला तरी ऐनवेळी होणाऱ्या नफावसुलीमुळे बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारात सर्तकतेने व्यवहार करावेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी असंख्य एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. जवळजवळ सर्व एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकारच्या जोरदार पुनरागमनाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एक्झिट पोल अनेक वेळा अपयशी ठरले असले तरी खरे चित्र १४ नोव्हेंबर रोजीच स्पष्ट होईल. त्यामुळे गुतंवणूकदारांनी सावध राहणे गरजेचे आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 595 अंकांची वाढ नोंदवत 84,466.51 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 180.85 अंक म्हणजेच 0.70% वाढ नोंदवत 25,875.80 वर बंद झाला, बँक निफ्टी 136.50 अंक म्हणजेच 0.23% वाढ नोंदवत 58,274.65 वर बंद झाला. या तेजीमुळे गुंतवणूकदार उत्साहात आहेत. मात्र, गुतंवणूकदारांनी सावध राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर शेअर बाजारात उत्साह दिसत आहे. मात्र, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अपेक्षेपेक्षा कमी जागा जिंकल्या तर बाजार काही काळासाठी घसरू शकतो. एनडीएने कमी जागा जिंकल्या तर निफ्टीत ५ ते ७ टक्के घसरण होण्याची शक्यता आहे. या काळात परदेशी गुंतवणूकदार देखील त्यांचे पैसे काढून घेऊ शकतात, ज्यामुळे रुपया किंचित कमकुवत होऊ शकतो आणि बाजार अस्थिर होऊ शकतो. चलन, बाँड दर आणि नफा वाढू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच टॅरिफबाबत ट्रम्प यांनी काही संकेत दिले आहेत. त्याचाही बाजारावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.