रॉबर्ट वाड्रा यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र
मनी लाँड्रिंग प्रकरण : न्यायालयाकडून ईडीला अधिक वेळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वड्रा यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रावर शनिवारी दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात सुनावणी झाली. मनी लाँड्रिंगसंबंधी या प्रकरणात वड्रा यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्राशी संबंधित अतिरिक्त कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितला असून न्यायालयाने मागणी मान्य केली. विशेष न्यायालयाने पुढील सुनावणी 24 जानेवारी 2026 रोजी ठेवली आहे.
2016 मध्ये संजय भंडारी यांच्या दिल्लीतील जागेवर प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांपासून हे प्रकरण सुरू झाले. भंडारी हे एक वादग्रस्त संरक्षण सल्लागार होते. संरक्षण करारांवर कमिशन घेऊन परदेशी बनावट कंपन्यांद्वारे काळा पैसा लाँड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ईडीच्या तपासानुसार, भंडारी यांनी 2009 ते 2016 दरम्यान यूएई-नोंदणीकृत बनावट कंपन्यांद्वारे ब्रिटन आणि दुबईमधील मालमत्तेत गैरकायदेशीरपणे मिळवलेले पैसे गुंतवल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात यावर्षी जुलैमध्ये पीएमएलए अंतर्गत वड्रा यांची जबानी नोंदवण्यात आली होती. फेडरल अँटी मनी लाँड्रिंग एजन्सीने रॉबर्ट वड्रा यांना परदेशातील आर्थिक व्यवहार आणि भंडारीशी संबंधित मालमत्तांशी जोडले होते. त्यांच्यावर आधीच परदेशात अघोषित मालमत्ता असल्याचा आरोप आहे. भंडारी 2016 मध्ये भारत सोडून गेल्यानंतर दिल्लीच्या न्यायालयाने त्यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केले होते. ईडीने यापूर्वी भारतातील अनेक मालमत्ता जप्त केल्या असून त्या वड्रा किंवा त्यांच्याशी संबंधित कंपन्यांशी संबंधित असल्याचे मानले जाते. या मालमत्तांमध्ये भंडारीच्या परदेशी व्यवहारांमधून मिळवलेल्या गुह्यातून मिळवलेली रक्कम समाविष्ट आहे.
Comments are closed.