Supriya Sule’s letter to Fadnavis regarding investigation
या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून कोणावरही अन्याय होणार नाही, याची शाश्वती देण्यासाठी राज्याचे प्रमुख आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून पुढे यावे, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
(Mahadev Munde Murder) पुणे : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यातील वातावरण तापलेले असतानाच परळीत सव्वा वर्षापूर्वी झालेल्या महादेव मुंडे यांचे हत्या प्रकरणही समोर आले आहे. या हत्येबाबत महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणीही केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंडे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. (Supriya Sule’s letter to Fadnavis regarding investigation)
परळी शहरातील ‘महादेव मुंडे खूनप्रकरणा’चा तपास गेली काही महिन्यांपासून रेंगाळला आहे. मुंडे यांचे 21 ऑक्टोबर 2023 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर 22 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले. अद्याप त्यांच्या मारेकऱ्यांचा तपास लागलेला नसल्याने गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासंदर्भात परळी पोलीस ठाण्यात कार्यरत काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या फोनचे सीडीआर तपासण्याची मागणी मुंडे कुटुंबीयांनी केली आहे. त्यांची ही मागणी योग्य असून याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य ती कार्यवाही करावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
हेही वाचा – Swargate Rape Case : शक्ती कायद्याची अंमलबजावणी सरकार कधी करणार? वडेट्टीवारांचा सवाल
महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली असून हा तपास सीआयडीकडे सोपवावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. याखेरीज परळी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सानप, भास्कर केंद्रे, गोविंद भताने आणि विष्णू फड या कर्मचाऱ्यांच्या फोनचे 21 ऑक्टोबर 2023 ते 10 जानेवारी 2024 दरम्यानचे सीडीआर काढले तर या प्रकरणाचा तपास थांबविण्यासाठी कोणत्या बंगल्यावरून फोन आला? हे प्रकरण दाबण्यासाठी कोणी कोणी फोन केले? तसेच खून कोणी केला? त्याचा ‘मास्टरमाइंड’ कोण? हे निष्पन्न होईल, असे मुंडे कुटुंबीयांचे म्हणणे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
एवढा प्रदीर्घ काळ रखडलेल्या या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंडे कुटुंबीयांनी केलेली ही मागणी योग्य आहे, अशी आमची भूमिका आहे. या महाराष्ट्रात कायद्याचे राज्य असून कोणावरही अन्याय होणार नाही, याची शाश्वती देण्यासाठी राज्याचे प्रमुख आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा – Swargate Case : स्वारगेट प्रकरणाला एसटीची खासगी सुरक्षा कारणीभूत, कदमांकडून पोलिसांची पाठराखण
Comments are closed.