किवींनी उडवला झिम्बाब्वेचा धुव्वा

गुरुवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करणाऱया न्यूझीलंडने आज यजमान झिम्बाब्वेचा 8 विकेट आणि 37 चेंडू राखून पराभव करत तिरंगी टी-20 मालिकेच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या दिशेने धाव घेतली आहे. या मालिकेत प्रत्येक संघ चार सामने खेळणार आहे आणि झिम्बाब्वेची कामगिरी पाहता या स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातच खेळला जाणार हे स्पष्ट दिसतेय.

आज झिम्बाब्वेच्या 121 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना फार कष्ट पडले नाही. टीम सिफर्ट (3) लवकर बाद झाला. मात्र त्यानंतर डेव्हन कॉन्वेने 40 चेंडूंत 59 धावा ठोकताना रचिन रवींद्रसह (30) 59 धावांची तर डॅरिल मिचेलसह (नाबाद 26) 58 धावांची अभेद्य भागी रचत संघाला 14 व्या षटकांतच विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी सलामीच्या वेस्ली मधेवेअर (36) आणि ब्रायन बेनेट (21) यांनी 37 धावांची सलामी दिली. मात्र ही जोडी फुटल्यानंतर झिम्बाब्वेला पुणीही सावरू शकला नाही. त्यांना 20 षटकांत 7 बाद 120 धावा करता आल्या.

Comments are closed.