IND vs SA: कर्णधारपदामुळे 'स्काय'चा फॉर्म हरवला? जाणून घ्या आकडे काय सांगतात

टी-20 क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावून सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) 19 टी-20 डाव उलटून गेले आहेत. जुलै 2024 मध्ये कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्याने फक्त दोन अर्धशतके केली आहेत. मागील 19 डावांमध्ये त्याने केवळ 222 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवची आहे. आपल्या आवडत्या फॉरमॅटमध्ये ‘सूर्या’ धावा काढण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, त्याने शेवटचे अर्धशतक झळकावून एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कटक येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सूर्या आपल्या आवडत्या तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला, पण तरीही खराब फॉर्मने त्याचा पिछा सोडला नाही. पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात टॉस गमावल्यानंतर टीम इंडिया फलंदाजीसाठी मैदानात उतरली. संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि उपकर्णधार शुबमन गिल (Shubman gill) पहिल्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलने केवळ चार धावा केल्या आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला.

त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव क्रीजवर आला. सूर्याकडून प्रत्येकजण मोठ्या खेळीची अपेक्षा करत होता. मात्र, सूर्याने यावेळीही आपल्या चाहत्यांना निराश केले. 11 चेंडूंच्या आपल्या खेळीत सूर्यकुमारने केवळ 12 धावा करून आपली विकेट गमावली. एक चौकार आणि एक षटकार त्याने लगावला होता. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर ‘स्काय’ने हवेत शॉट मारला आणि मार्करमने तो झेल घेण्यात कोणतीही चूक केली नाही.

टी-20 विश्वचषक 2024 नंतर कर्णधारपद स्वीकारल्यानंतर सूर्यकुमार यादव जणू धावा करण्याची कलाच विसरला आहे. कर्णधारपद सांभाळल्यापासून त्याच्या बॅटमधून फक्त दोन अर्धशतके निघाली आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ‘स्काय’ने शेवटचे अर्धशतक झळकावून एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला आहे. त्याने 12 ऑक्टोबर 2024 रोजी बांगलादेशविरुद्ध शेवटचे अर्धशतक केले होते.

मोठ्या संघांविरुद्ध तर सूर्या धावा करण्यासाठी पूर्णपणे झगडताना दिसला आहे. मागील 10 डावांमध्ये सूर्यकुमारने फक्त एकदाच 30 धावांचा आकडा पार केला आहे. सूर्यकुमार यादव भारतीय टी-20 संघात फक्त कर्णधार असल्यामुळे टिकून आहे, हे एक सत्य आहे. पण सूर्याच्या सतत खालावत असलेल्या फॉर्ममुळे टीम व्यवस्थापनाची चिंता वाढली आहे. जर सूर्याने लवकरच आपला फॉर्म परत मिळवला नाही, तर प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याच्या जागेवरही प्रश्नचिन्ह उभे राहू शकते.

Comments are closed.