IND vs ENG: चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, आणखी एक स्टार गोलंदाज सामन्याबाहेर
भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) दोन्ही संघात कसोटी मालिकेतील चौथा सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याच्या एक दिवस आधीच टीम इंडियाला (Team india) मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज आकाश दीप (Aakash Deep) दुखापतीमुळे या सामन्याबाहेर गेला आहे. त्याला ग्रोइन दुखापत झाली आहे आणि लॉर्ड्समध्ये तो लंगडत मैदानाबाहेर गेला होता. आकाश दीपच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघ (Indian cricket team) अडचणीत सापडला आहे. याआधीच अर्शदीप सिंग ( Arshdeep singh) दुखापतीमुळे बाहेर गेला आहे, तर नीतीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या चौथ्या कसोटीपूर्वी भारताला हा मोठा झटका मानला जात आहे. पत्रकार परिषदेत बोलताना शुबमन गिलने (Shubman gill) सांगितले की, आकाश दीप या निर्णायक सामन्यात खेळणार नाही. त्याची ग्रोइन दुखापत अजूनही ठीक झालेली नाही. नीतीश रेड्डी आणि अर्शदीप सिंग आधीच संघाबाहेर आहेत. अशा परिस्थितीत ओल्ड ट्रॅफर्डवर कर्णधार गिलला प्रसिद्ध कृष्णा आणि अंशुल कंबोज या दोघांपैकी तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची निवड करावी लागेल. आकाश दीपने एजबॅस्टन कसोटीत जबरदस्त प्रदर्शन केले होते. लॉर्ड्समध्येही त्याची गोलंदाजीची लय चांगली होती. या मालिकेत त्याने दोन सामन्यांतच 11 विकेट्स घेतल्या होत्या.
इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना भारतासाठी खूपच निर्णायक ठरणार आहे. भारत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे आणि ओल्ड ट्रॅफर्डवर विजय मिळवणं आवश्यक आहे. आकाश दीपच्या बाहेर पडल्यानंतर तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची निवड हे संघ व्यवस्थापनासमोरचं मोठं आव्हान असेल. प्रसिद्ध कृष्णा पहिल्या दोन सामन्यांत प्रभाव दाखवू शकला नाही आणि त्यामुळेच त्याला लॉर्ड्समध्ये वगळण्यात आलं होतं. अंशुल कंबोजला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे मॅंचेस्टरमध्ये त्याचं कसोटी पदार्पण होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.