ठाण्याच्या बाळकुममधील मतदारांची नावे गुजराती, तामीळ, कानडी भाषेत; त्वरित दुरुस्ती करा.. शिवसेनेचे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन
चारकोपच्या मतदार यादीमधील मतदारांची नावे मराठीऐवजी अन्य भाषेत छापली असल्याची बाब उघडकीस येताच ठाण्याच्या बाळकुममधील मतदारांची नावेदेखील गुजराती, तामीळ, कानडी तसेच बंगाली भाषेत असल्याचे आढळून आले आहे. महाराष्ट्राचा कारभार मराठीमध्ये असतानाही मतदारांची नावे मात्र वेगवेगळ्या भाषेत छापल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान या यादीतील नावांची त्वरित दुरुस्ती करावी व सर्व नावे मराठीतच छापावीत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
ठाण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये मतदार याद्यांमधील गोंधळ चव्हाट्यावर येत आहे. शिवसेनेसह विरोधी पक्षांचे पदाधिकारी रोज या बोगसगिरीचा पर्दाफाश करत असून ठाणे विधानसभा मतदारसंघातील बाळकुम, दोस्ती, पिरामल वैकुंठ येथील अनेक मतदारांची नावे मराठीऐवजी अन्य भाषेत छापली आहेत. त्यामुळे ही नावे कुणालाही वाचता येत नाहीत. त्याचा गैरफायदा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
1 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी बाळकुममधील मतदार याद्यांच्या घोळाबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन पाठवले असून सोबत सर्व पुरावेदेखील दिले आहेत.
2 निवडणूक यंत्रणेने तातडीने अन्य भाषेतील नावे कशी काय छापली गेली याचे स्पष्टीकरण द्यावे आणि लवकरात लवकर त्यात दुरुस्ती करून फक्त मराठी भाषेतील सुधारित यादी पुन्हा प्रकाशित करावी अशी मागणी केली आहे
हा घ्या पुरावा…
ठाणे विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राम जाधव यांना भाग क्रमांक १३४ मधील यादीचे पुरावे देण्यात आले आहेत. बाळकुम, दोस्ती, वेस्ट काऊंटी, पिरामल वैकुंठ परिसरातील इतर भाषांमध्ये छापले गेलेल्या मतदारांचे अनुक्रमांक ८६, ११३, ११४, ११७, १२०, १३१, २०३, २०४, २६१, ३४६, ३४७, ३४९, ३८२, ४६८, २६९. सुधारित यादी लवकरात लवकर प्रकाशित करावी, अशी मागणी उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील व बाळकुम शाखाप्रमुख संतोष भोईर यांनी केली आहे.
Comments are closed.