ठाण्यात सवादोन कोटींचे एमडी जप्त, मध्य प्रदेशातून ड्रग्जची तस्करी; चौघांच्या मुसक्या आवळल्या

मध्य प्रदेशातून मेफेड्रोन ड्रॅग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या चार तस्करांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. या चौघांकडून पोलिसांनी सवादोन कोटींचा १ किलो ७१ ग्रॅम एमडी व कार जप्त केली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एवढा मोठ्या प्रमाणात साठा आणल्याचा अंदाज पथकाने वर्तवला असून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

ठाण्यातील चरई परिसरात काही जण एमडीची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल म्हस्के यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने चरईतील एमटीएनएल कार्यालयासमोर सापळा रचला. दरम्यान त्यांना एक कार संशयास्पद वावरताना दिसली. पोलिसांनी ती गाडी ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांना २ कोटी १४ लाख ३२ हजारांचे एमडी मिळाले.

याप्रकरणी पोलिसांनी कारमधील इम्रान उर्फ बब्बू खान, वकास खान, ताकुद्दीन खान व कमलेश चौहान या चौघांना अटक केली. हे चौघेही मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्यातील इम्रान व कमलेश हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून इम्रानवर सात व कमलेशवर दोन गुन्हे दाखल आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी आणले कुठून, कुणाला विक्री करणार होते, यात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली. तसेच हे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज व्यक्त करत त्यांनी ड्रग्ज ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेलमध्ये किंवा पबमध्ये विक्रीसाठी आणले होते का याचादेखील तपास गुन्हे शाखा करत आहे.

बकरे चोरणाऱ्या तिघांना अटक

भिवंडी – बकऱ्यांची चोरी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. आमिर मोमिन, माझीद मोमिन, अनिस उर्फ कटोरा मोमिन अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही नालापार परिसरातील मोहम्मद सादिक अन्सारी यांनी इमान हॉटेल येथील एम. के. टेक्सटाईल्स परिसरात बांधलेले ७५ हजार रुपये किमतीचे तीन बकरे घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अन्सारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला.

प्रवाशावर कात्रीने हल्ला

ठाणे – सीटवर झोपू नको असे सांगणाऱ्या प्रवाशावर दोन माथेफिरूंनी कात्रीने हल्ला केल्याची घटना मंगला एक्स्प्रेसमध्ये घडली. भोला पाल असे प्रवाशाचे नाव असून तो उत्तर प्रदेशात मजूर म्हणून काम करतो. दरम्यान त्यांनी जनरल डब्यात बसायला जागा मिळावी म्हणून सीटवर झोपलेल्या एका प्रवाशाला उठवले. याचाच राग मनात धरून त्या प्रवासी व त्याच्या मित्राने भोलाला मारहाण करत पोटात कात्री भोसकली. जखमी भोलावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Comments are closed.