AUS vs ENG: गाबा कसोटीतही ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय! ऍशेस मालिकेत 2-0 ने आघाडी
पर्थनंतर आता गाबा (Gabba) येथेही ऑस्ट्रेलियाने आणखी एक धमाकेदार विजय मिळवला आहे. इंग्लंडने दिलेले 65 धावांचे लक्ष्य कंगारू संघाने दुसऱ्या डावात केवळ 2 गडी गमावून पूर्ण केले. ट्रॅव्हिस हेड आणि मार्नस लाबुशेन स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले असले तरी, ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून हा सामना जिंकला. या विजयासह, ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत 2-0 अशी मजबूत आघाडी घेतली आहे.
मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) कामगिरी या सामन्यातही कमालीची राहिली. त्याने संपूर्ण सामन्यात एकूण 8 विकेट्स घेतल्या, तसेच फलंदाजीमध्ये 77 धावांची दमदार खेळी देखील केली. दुसरीकडे, मायकल नेसरनेही गोलंदाजीत ‘पंजा’ (पाच विकेट्स) मिळवला.
कसोटीच्या चौथ्या दिवशी बेन स्टोक्स आणि विल जॅक्स यांनी चांगली भागीदारी केली होती आणि एका वेळी असे वाटले होते की इंग्लंड हे दोन्ही फलंदाज ऑस्ट्रेलियाला लढण्यासारखे लक्ष्य देऊ शकतील. मात्र, जॅक्स 41 धावांवर बाद होताच, सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. कर्णधार बेन स्टोक्सही 50 धावा काढून नेसरचा शिकार बनला. यानंतर बघता बघता संपूर्ण इंग्लिश संघ 241 धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला 65 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. ट्रॅव्हिस हेड 22 धावा करून बाद झाला, तर मार्नस लाबुशेनला गस ॲटकिन्सनने फक्त 3 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जेक वेदरल्ड यांनी संघाला आणखी कोणताही धक्का लागू दिला नाही. वेदरल्ड 17 आणि स्मिथ 9 चेंडूंमध्ये 23 धावा काढून नाबाद राहिले आणि संघाला विजय मिळवून दिला.
गाबा कसोटीच्या पहिल्या डावात मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा कहर केला. स्टार्कने इंग्लिश संघाच्या फलंदाजीची फळी उध्वस्त करत 6 विकेट्स घेतल्या. फलंदाजीमध्येही त्याने 77 धावांची दमदार खेळी केली. दुसऱ्या डावात मायकल नेसरने आपल्या गोलंदाजीने खूप प्रभावित केले. नेसरने 16.2 षटकांत 42 धावा देत 5 विकेट्स आपल्या नावावर केल्या. स्टार्कने दुसऱ्या डावातही 2 विकेट्स घेतल्या.
Comments are closed.