मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करावे; कैलास पाटील यांचे आव्हान

शेतकऱ्यांबाबत सातत्याने अवमानकारक वक्तव्य करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील यांचा एक व्हिडीओ शेअर केला असून यात ते रमी खेळताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून कोकोटे यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार कैलास पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करावे असे आव्हान दिले आहे.

जंगली रमी आणि ऑनलाईन गेममुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे आयुष्य बरबाद झाले आहे. त्यामुळे अशा खेळांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आपण सभागृहात केली होती. तसेच यासाठी तेलंगणासारख्या राज्याचे उदाहरण दिले होते. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे बोट दाखवत याबाबतचा निर्णय केंद्राचा असल्याचे सांगितले होते. त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारीच अशा खेळात अडकले असून त्यांना याचे व्यसन लागले आहे. ते या खेळाच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर बंदी घातली नसवी, असे कैलास पाटील यांनी म्हटले आहे.

एकीकडे शेतकरी कर्जमाफीची वाट बघतायेत पण दुसरीकडे कृषीमंत्री मात्र रमी खेळण्यात दंग आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा आणि पार्टी विथ डिफरन्स हे सिद्ध करावे, असे आव्हान कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

Comments are closed.