पंतप्रधानांनी 'सिंदूर' वर आपले मौन तोडले पाहिजे!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुनरुच्चारानंतर काँग्रेस संतप्त : संसद अधिवेशनात पडसाद उमटणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’संबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवल्याचा दावा केला आहे. तसेच पाच लढाऊ विमाने पाडण्यात आल्याचे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. याचे तीव्र पडसाद आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सरकारची कोंडी करण्यासाठी कडक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. 10 मे पासून आजपर्यंत ट्रम्प यांनी 24 वेळा दोन गोष्टी पुन्हा-पुन्हा सांगितल्या आहेत. आपल्या पहिल्या विधानात ट्रम्प म्हणाले की त्यांनी भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले. त्यांच्या दुसऱ्या विधानात ते म्हणाले की जर भारत आणि पाकिस्तानला अमेरिकेसोबत व्यवसाय करायचा असेल तर त्यांना हे युद्ध थांबवावे लागेल. आता यानंतर त्यांनी एक नवीन दावा करत पाच लढाऊ विमाने पाडण्यात आल्याचे वक्तव्य केले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावरून जयराम रमेश यांनी सरकारला अनेक प्रश्नांची विचारणा करत जाब विचारला आहे. तसेच आता सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात पंतप्रधानांनी पाकिस्तानविरोधातील ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत नेमकी माहिती सभागृहात मांडावी, अशी मागणी केली आहे. पंतप्रधानांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मंत्र्याने दिलेली माहिती आम्हाला चालणार नाही, असा इशाराही रमेश यांनी दिला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या फक्त दोन दिवस आधी ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य युद्ध रोखण्यात भूमिका बजावल्याचे विधान केले. यासंबंधी पावसाळी अधिवेशनात काँग्रेससह सर्व विरोधक चर्चेची मागणी करतील. पहलगाम, ऑपरेशन सिंदूर, चीन यावर चर्चा झाली पाहिजे. यावर फक्त पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे, असे जयराम रमेश म्हणाले. सर्वपक्षीय बैठक ही फक्त औपचारिकता आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अर्धा तास पंतप्रधान मोदी केवळ पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विरोधकांकडून सहकार्य मागतील. त्यानंतर, त्यांना जे हवे ते संसदेत होईल. ते स्वत: काहीही बोलणार नाहीत. प्रत्येक अधिवेशनात हे घडते. जे. पी. न•ा, किरेन रिजिजू आणि इतर मंत्री सभागृह चालवण्यात आघाडीवर राहतील. हे सर्व दुपारी 11 ते 1 वाजेपर्यंत चालेल आणि नंतर काहीही होणार नाही, असेही जयराम रमेश पुढे म्हणाले.
ट्रम्प यांच्या दाव्यांवर काँग्रेसचे तीन प्रश्न…
भारत-पाकिस्तान युद्धावरील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर काँग्रेसने शनिवारी केंद्र सरकारला तीन प्रश्न विचारले आहेत.
पहिला – डोनाल्ड ट्रम्प यांनी खरोखरच युद्धबंदी थांबवली का?
(आजपर्यंत ट्रम्प यांनी 24 वेळा त्यासंबंधी उल्लेख केला.)
दुसरा – ट्रम्प यांनी व्यापाराची धमकी देऊन युद्ध थांबवले का?
तिसरा – युद्धात कोणत्या देशाची पाच लढाऊ विमाने पडली?
नेमक्या उत्तराची काँग्रेसची अपेक्षा
डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसोबत बोलताना दावा केला की, भारत-पाकिस्तान संघर्षात खरोखरच 5 जेट विमाने पडली. तथापि, त्यांनी कोणत्या देशाची विमाने पडली याचा उल्लेख केलेला नाही. पावसाळी अधिवेशनात ट्रम्प यांच्या या दाव्यांवर काँग्रेसला केंद्र सरकारकडून उत्तरे हवी आहेत. ‘पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे बऱ्याच काळापासून मित्र आहेत. सप्टेंबर 2019 मधील ‘हाऊडी मोदी’ असो किंवा फेब्रुवारी 2020 मधील ‘नमस्ते ट्रम्प’ असो, दोघांचेही दृढ नाते आहे. आता पंतप्रधान मोदींना स्वत: संसदेत निवेदन द्यावे लागेल.’ असे काँग्रेसने म्हटले आहे.
Comments are closed.