2013 पासून देशात एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही!
एनएसए अजित डोवाल यांचे मोठे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांनी एक मोठे विधान केले आहे. भारतात दहशतवाद नियंत्रणात आल्याचे स्पष्ट करताना 2013 नंतर देशात कोठेही मोठा हल्ला झाला नसल्याचे सांगितले. सरदार पटेल स्मृती व्याख्यानात बोलताना डोवाल यांनी हा दावा करत देशात दहशतवादाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यात आल्याचे जाहीर केले. तथापि, जम्मू काश्मीरमधील परिस्थिती वेगळी असून तेथील हल्ल्यांचा समावेश या हल्ल्यांमध्ये अंतर्भूत नसल्याचेही ते पुढे म्हणाले.
जम्मू काश्मीर हे पाकिस्तानच्या प्रॉक्सी वॉर किंवा गुप्त युद्धाचे रणांगण आहे. येथील दहशतवादाला पाकिस्तानकडून थेट प्रतिसाद दिला जातो. मात्र, काश्मीर वगळता उर्वरित संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यांपासून सुरक्षित राहिला आहे. सरकारकडून यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले जात आहेत. गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने आणि सुरक्षा दलाच्या सहकार्यामुळे संशयित लोकांना अटक करण्यात आली आहे. तसेच स्फोटके जप्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शत्रूंच्या सततच्या कारवाया असूनही या भागात दहशतवादी हल्ले झालेले नाहीत. 2014 पासून डाव्या विचारसरणीच्या दहशतवादी कारवायांमध्येही झपाट्याने घट झाली आहे. शत्रू अजूनही खूप सक्रिय असले तरी, सुदैवाने या भागात कोणत्याही दहशतवादी घटना घडलेल्या नाहीत. 2014 च्या तुलनेत डाव्या विचारसरणीच्या दहशतवादी कारवायांमध्ये 11 टक्क्यांपेक्षा कमी घट झाली आहे.
Comments are closed.