हापूसचा कोकणच ‘बापूस’! वलसाड हापूसच्या भौगोलिक मानाकंन मागणीला कोकणात विरोध

कोकणच्या हापूस आंब्याला २०१८ साली भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर हापूसच्या नावा आपला आंबा खपवणाऱ्या अनेकांची दुकानं बंद पडू लागली.२०१६ पासून अफ्रिकेतून हिंदुस्थानच्या बाजारात येणारा मालावी हापूस हा सुध्दा २०१८ नंतर मालावी मँगो नावाने बाजारात येऊ लागता.”हापूस” नावाची जादू लक्षात घेऊन आता हापूस नाव ढापण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. वलसाड हापूस असे भौगोलिक मानांकन मिळावे म्हणून मागणी केली जात असून त्याला कोकणातील आंबा बागायतदार आणि उत्पादकांनी तीव्र विरोध केला आहे.’हापूसचा कोकणच बापूस’ म्हणत बागायतदारांनी विरोधात दंड थोपटले आहेत.

गुजरात येथील गांधीनगर व नवसारी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून वलसाड हापूसच्या भौगोलिक मानांकनासाठी अर्ज दाखल करण्यात आला.३० ऑक्टोबर रोजी त्याबाबत सुनावणीही पार पडली आहे.वलसाड हापूसच्या भौगोलिक मागणीला कोकणातून विरोध होत आहे.

कोकणचा १० वर्ष लढा

हापूस आंबा सांगून धारवाडचा किंवा अन्य राज्यातील आंबा विकला जात होता.स्वस्त दर असल्याने ग्राहकांची अनेकवेळा फसवणूक होत होती.त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यातील आंबा बागायतदार आणि आंबा उत्पादक एकत्र आले.त्यांनी २००८ साली कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था स्थापन केली.हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवणे हा एकमेव उद्देश या संस्थेचा होता.दहा वर्षांच्या पाठपुराव्यानंतर २०१८ मध्ये हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले.त्यानंतर हापूसच्या नावाने विक्री करणाऱ्या अन्य आंब्यांना आळा बसला. वलसाड हापूसला भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी मागणी करण्यात आली आहे.त्याला कोकणातील आंबा बागायतदार आणि उत्पादकांनी विरोध केला आहे.

८० हजार हापूसची कलम अफ्रिकेत नेण्यात आली होती.त्या कलमांचा आंबा २०१६ पासून आपल्या देशात मालावी हापूस नावाने येऊ लागला.२०१८ साली आम्हाला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर आम्ही मालावी हापूसच्या विरोधात आवाज उठवला होता.त्यानंतर तोच आंबा मालावी मॅंगो नावाने बाजारात येत आहे.वलसाड हापूस मानांकन देण्यास आमचा विरोध आहे,त्याविरोधात आमचा लढा सुरू आहे. – मुकुंद जोशी, आंबा बागायतदार, रत्नागिरी

२०२४ शेतकऱ्यांकडे हापूसचे जीआय मानांकन

२०१८ साली कोकणातील हापूसला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी हे मानांकन घेतले आहे.रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड,पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील २०२४ शेतकऱ्यांनी हापूसचे भौगोलिक मानांकन घेतले आहे.हि संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

कोकणचा आंबा म्हणजेच हापूस अशी जगभर ओळख आहे.कोकणच्या हापूस मधूर चव अन्य कोणत्या आंब्याला हापूस नाव लावून येणार नाही.वलसाड हापूस मानाकंन मिळाल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार.- डॉ.विवेक भिडे, अध्यक्ष, कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटना

वलसाड हापूसला मानाकंन मिळू नये म्हणून आम्ही दावा दाखल केला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार भास्कर जाधव आणि आमदार शेखर निकम यांचीही भेट घेऊन याविरोधात त्यांनीही आवाज उठवावा अशी मागणी केली आहे.कोकणातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन याविरोधात लढा उभारायला पाहिजे. – प्रकाश साळवी, आंबा बागायतदार, गोळप

Comments are closed.