तृणमूल नेता जहांगीर खानला अटक.

नेपाळ सीमेवरून घेतले ताब्यात : खंडणीवसुलीचा आरोप : देश सोडण्याच्या होता तयारीत

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगाल पोलिसांच्या एसटीएफने सोमवारी तृणमूल नेता जहांगीर खानला अटक केली आहे. नेपाळ सीमेनजीक त्याला पकडण्यात आले आहे. दक्षिण 24 परगणा जिल्ह्याच्या फालता पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात 7 गुन्हे नोंद झाले होते. जहांगीर हा नेपाळला पळ काढण्याच्या तयारीत होता असे समजते.

जहांगीरला खंडणी वसुलीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर जहांगीरच्या काही समर्थकांनी महिलांना सामूहिक बलात्काराची धमकी दिली होती. जहांगीरने अलिकडेच पार पडलेली विधानसभा निवडणूक फालता मतदारसंघातून लढविली होती. निवडणुकीदरम्यान झालेल्या गैरप्रकारांमुळे तेथे 21 मे रोजी पुनर्मतदान झाले होते. तर पुनर्मतदानाच्या 48 तासांपूर्वी जहांगीरने निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. या निवडणुकीत जहांगीरचा पराभव झाला होता, तेव्हापासून तो गायब झाला होता.

मे महिन्यात जहांगीरने कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल करत अटकेपासून संरक्षण मागितले होते. जहांगीरला 2019 मध्ये नोंद एका गुन्ह्याप्रकरणी आणि फालता पुनर्मतदानापूर्वी उच्च न्यायालयाने संरक्षण प्रदान केले होते. परंतु 26 मे रोजी सर्व संरक्षण मागे घेण्यात आले होते.

'फ्लॉवर' शैलीचे चिन्ह

जहांगीरने निवडणूक प्रचारादरम्यान स्वत:ला चित्रपट ‘पुष्पा’च्या भूमिकेप्रमाणे सादर केले होते. त्याने अनेकवेळा चित्रपटातील संवाद ‘पुष्पा झुकेला नहीं साला’ देखील जाहीरपणे म्हटला होता. जहांगीर हा तृणमूल काँग्रेस महासचिव अभिषेक बॅनर्जी यांचा अत्यंत निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.

Comments are closed.