काश्मीर-सोपोरमध्ये दोन संकरित दहशतवाद्यांना अटक
शस्त्रास्त्रे, दारुगोळा जप्त : पळून जाण्याचा प्रयत्न फसला
मंडळ संस्था/श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील सोपोरमध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन हायब्रिड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. 22 आरआर आणि 179 बीएन सीआरपीएफच्या सहकार्याने सोपोरमधील मोमिनाबाद येथील सादिक कॉलनी येथे संयुक्त कारवाईदरम्यान या दोन्ही हायब्रिड दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर परिसरात संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींबद्दल माहिती मिळाल्यानंतर तपासणी सुरू असतानाच दोघेही दहशतवादी सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात सापडले.
तपासादरम्यान, फ्रूट मंडी सोपोरहून अहत बाबा क्रॉसिंगकडे येणाऱ्या दोन व्यक्तींनी पोलीस आणि सुरक्षा दलांची उपस्थिती पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा जवानांनी पाठलाग करून त्यांना पकडले. संयुक्त पथकाने जलदगतीने कारवाई करत दोघांनाही घटनास्थळी अटक केली. अटक केलेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. या दहशतवाद्यांकडून एक पिस्तूल, एक मॅगझिन, 20 जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या जप्तींवरून या भागात दहशतवादी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे दिसून येते.
या कारवाईसंदर्भात कायद्याच्या संबंधित कलमांखाली सोपोर पोलीस स्थानकामध्ये एफआयआर क्रमांक 253/2025 नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी आता सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. जम्मू काश्मीर पोलीस खोऱ्यात शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी जोरदार मोहीम सुरू असतानाच हायब्रिड दहशतवाद्यांना अटक झाली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर जम्मू काश्मीरमध्ये विशेष दक्षता ठेवण्यात येत आहे. सुरक्षा दलांनी अनेक मोक्याच्या ठिकाणी विशेष पाळत ठेवली आहे. दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संशयित व्यक्तींना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी छापे टाकले जात आहेत.
Comments are closed.