महाराष्ट्रात तीन साप एकमेकांची शेपूट तोंडात धरून प्रत्येकाला गिळायला बघताहेत, उद्धव ठाकरे यांचा महायुतीवर घणाघात

महाराष्ट्रात सर्पाकार परिस्थिती असून तीन साप प्रत्येकाची शेपूट प्रत्येकाच्या तोंडात धरून एकमेकांना गिळायला बसलेत, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महायुतीवर केला. अशी गिळागिळी सुरू झाली तर जनतेकडे कोण बघणार, असा सवालही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे गटाचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खाडे यांनी आपले शेकडो कार्यकर्ते आणि अनेक सरपंचांसह आज ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करताना त्यांना मार्गदर्शन केले.

पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले पुंडलिक खाडे मध्यंतरीच्या काळात शिंदे गटात गेले होते. ते पुन्हा स्वगृही परतल्याचा धागा पकडून उद्धव ठाकरे म्हणाले की, एखाद्याकडून चूक झाली तर समजू शकतो, पण अपराध होता कामा नये. रागाच्या भरात, अनावधानाने चुकीचे पाऊल उचलले जाऊ शकते, पण लक्षात आल्यानंतर ती चूक सुधारली गेली पाहिजे आणि ती सुधारण्याची संधी दिली पाहिजे.

सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या

सद्यस्थिती पाहता महाराष्ट्रातील जनता नेमका आपला कोण याकडे डोळे लावून बसली आहे, राज्यातील शेतकरी तर फार हताश झाला आहे. त्याला नुकसानभरपाई तर सोडा, काहीच मिळत नाही. त्याला न्याय आपण मिळवून दिला पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

सत्तेसाठी गद्दार वाट्टेल ते करताहेत

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, हिंदुत्वासाठी शिवसेनेची स्थापना केली. तो उद्देश आणि हेतू गद्दार विसरले आहेत आणि सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला यावेळी चपराक लगावली.

शिवसेनेला पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली बनवा

बीड जिह्यात गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेमाखातर शिवसेना भाजपला झुकते माप देत आली. आता तिथे पुरती वाताहात झाली आहे. तिथे कुणीच कुणाचे नाही. अशा वेळेला सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी उभे राहणे हे शिवसेनेचे कर्तव्य आहे. शिवसेना तिथे पूर्वीपेक्षा जास्त वैभवशाली झाली पाहिजे म्हणजे तेथील जनता शिवसेनेसोबत आली पाहिजे. ते काम मेहनतीने आणि कर्तृत्वाने पूर्ण कराल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि बीडमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments are closed.