खेळ महोत्सवांतर्गत आज कॅरम, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स स्पर्धा; शिवसेना दक्षिण मध्य मुंबईतर्फे आयोजन

दक्षिण-मध्य मुंबईतील खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह निर्माण करणाऱ्या वार्षिक सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सवाअंतर्गत आता बैठका खेळांचे आकर्षण पाहायला मिळणार आहे. या महोत्सवात उद्या, रविवारी कॅरम, बुद्धिबळ, जिम्नॅस्टिक्स, अॅक्रोबॅटिक्स आणि योगासनांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये खुला गट ठेवण्यात आला असून, कोणत्याही वयोगटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात.
शिवसेना नेते आणि दक्षिण-मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांच्या संकल्पनेतून हा सांस्कृतिक, कला व खेळ महोत्सव सुरू आहे. खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक कौशल्याला प्रोत्साहन देणाऱ्या या महोत्सवातील विविध स्पर्धांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात उद्या दुपारी 12 वाजता दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर इंटरनॅशनल स्कूल येथे होणार आहे. जिम्नॅस्टिक्स, अॅक्रोबॅटिक्स आणि योगासनांच्या स्पर्धा चेंबूर येथील मुंबई पब्लिक स्कूल, वडवली येथे सकाळी 9.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये एकाग्रता, दूरदृष्टी आणि मानसिक कौशल्ये वाढवण्यास प्रोत्साहन देणे हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे आयोजक व शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांनी सांगितले.

Comments are closed.