अमेरिकेने दिली २४ हिंदुस्थानी असलेल्या टँकरवरील हल्ल्याची कबुली, हल्ल्यामागे काय सांगितले कारण?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ओमानच्या किनाऱ्याजवळ २४ हिंदुस्थानी कर्मचारी असलेल्या एका टँकरवर झालेल्या हल्ल्याची अमेरिकेने अधिकृत कबुली दिली आहे. अमेरिकन नौदलाने सोमवारी या टँकरवर कारवाई करत हल्ला केला, ज्यामुळे जहाजाला भीषण आग लागली. सुदैवाने या जहाजावरील सर्व २४ हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांची ओमानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे. अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आणि अमेरिकेची नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्यामुळेच ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमटी मॅरिव्हेक्स नावाच्या या जहाजावर अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाच्या विदेशी संपत्ती नियंत्रण कार्यालयाने आधीच निर्बंध लादले होते आणि त्याला ब्लॅकलिस्ट केले होते. इराणी आणि रशियन तेलाच्या विक्रीवर अमेरिकेने कडक निर्बंध घातले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जहाजांवर ओएफएसीकडून कारवाई केली जाते. याच कारवाईचा भाग म्हणून ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकन नौदलाने पलाऊ देशाचा ध्वज असलेल्या या टँकरवर हल्ला केला.

एमटी मॅरिव्हेक्स हे जहाज हिंदुस्थानी मालकीचे नाही. मात्र या जहाजाने गेल्या काही दिवसांत इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी तोडून निसटण्याचे तब्बल चार वेळा प्रयत्न केले होते. याआधी तीन वेळा अमेरिकन नौदलाने इशारा दिल्यानंतर हे जहाज माघारी फिरले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या जहाजाने ओमानच्या सागरी हद्दीचा वापर करत नाकेबंदी ओलांडण्याचा आणखी एक प्रयत्न केला. कारवाईपासून वाचण्यासाठी आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी जहाजावरील सिग्नल यंत्रणाही मुद्दाम बंद केली होती. या संशयास्पद हालचालींमुळे आणि स्पष्ट हेतू नसल्याने अमेरिकेने यावर कारवाई करत हल्ला केला.

ज्यावेळी जहाजावर हल्ला करण्यात आला, तेव्हा ते पूर्णपणे रिकामे होते. या संपूर्ण घटनेनंतर ओमानमधील हिंदुस्थानी दूतावासाने जहाजावरील सर्व २४ हिंदुस्थानी कर्मचाऱ्यांचे प्राण सुरक्षितपणे वाचवल्याबद्दल ओमानच्या स्थानिक प्रशासनाचे विशेष आभार मानले आहेत.

Comments are closed.