टीम इंडिया ए च्या जर्सीत वैभव सूर्यवंशी फेल! श्रीलंकेविरुद्ध 12 चेंडूंमध्येच संपला डाव

भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात युवा स्फोटक सलामीवीर वैभव सूर्यवंशीला पहिल्यांदाच भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याची ऐतिहासिक संधी मिळाली. या पदार्पणाच्या सामन्यात त्याच्यावर सर्वांच्या नजरा होत्या, मात्र सर्वांची निराशा झाली. भारताचा कर्णधार तिलक वर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

डावाची सुरूवात करण्यास वैभव मैदानावर आला. तो क्रीजवर आल्यापासूनच सकारात्मक दिसला, मात्र त्याला आपल्या खेळीचे रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात आले नाही. त्याने १२ चेंडूंत तीन चौकारांच्या सहाय्याने १४ धावा केल्या. त्याला श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराजने बाद केले. डावाच्या चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर शिराजने त्याला फुल लेंथ चेंडू टाकला. तो चेंडू बॅटवर चांगल्याप्रकारे आला, मात्र वैभवला नीट शॉट खेळता आला नीह. त्याने सरळ फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो चेंडू थेट मिड-ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला.

बाद झाल्यावर वैभव निराश दिसला, तर श्रीलंकेच्या खेळाडूंनी मोठा जल्लोष केला. त्याला लवकर बाद झालेले पाहून दांबुलामधील भारतीय चाहत्यांनी धक्का बसला. त्यावेळी भारत अ संघाची स्थिती १६ धावांवर एक विकेट अशी होती.

वैभव मागील काही महिन्यांपासून त्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत आहे. त्यामुळे तो या सामन्यातही त्याची पुनरावृत्ती करेल अशी अपेक्षा होती.

राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवने आयपीएल २०२६ हंगामात सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती. त्याने १६ सामन्यांत २३७ च्या स्ट्राईक रेटने ७७६ धावा केल्या. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली होती. त्यामध्ये एकाच हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही सामील आहे.

Comments are closed.