नाशिक हनी ट्रॅपमुळेच मिंधे सत्तेत आले; विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा

राज्यात सध्या हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा होत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 72 आजी-माजी अधिकारी आणि काही बडे नेते हनी ट्रॅपमध्ये अडकले असून या हनी ट्रॅपचा सूत्रधार नाशिकचा असल्याची चर्चा आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले होते. सध्या सभागृहात हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा होतेय. पण ना हनी आहे ना ट्रॅप. त्यावर आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे असल्याचा दावा केला आहे. तसेच या हनी ट्रॅपमुळेच मिंधे सत्तेत आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ना हनी आहे ना ट्रॅप, त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे देखील आहे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे. मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशाच सीडीमुळे झाली, इतकं मोठं ते प्रकरण आहे. मिंधे सत्तेही याच प्रकरणामुळे आले आहेत. त्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही. ज्या वेळेस आम्ही ते दाखवू, त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपयांचे तिकीटच लावावे लागेल. ते तिकीट लावूनच आम्हाला व्हिडीओ दाखवावा लागेल. पण, त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावे लागेल, एवढा मोठा भक्कम पुरावा त्यात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, मी अनेकदा सांगितले आहे की, महाराष्ट्रातले काही वरिष्ठ अधिकारी, मंत्री या हनी ट्रॅपमध्ये आहेत. त्याचे केंद्रबिंदू नाशिक, ठाणे आणि मुंबई आहे. महाराष्ट्रातले महत्त्वपूर्ण दस्तऐवज या हनी ट्रॅपमुळे असामाजिक तत्त्वांच्या हाती गेले आहेत. त्याचे परिणाम महाराष्ट्राला भोगावे लागणार आहे. महाराष्ट्राला धोका निर्माण झाला आहे. ती गोष्ट आम्ही विधानसभेच्या माध्यमातून सरकारला सांगत होतो. मी पेन ड्राईव्ह दाखवला त्यावेळेस अध्यक्षांनी मला नको नको नको, ते आपल्याकडेच ठेवा, असे म्हटले. त्यावेळेस माझ्याकडे पेन ड्राईव्ह मागितला असता तर मी देऊन टाकला असता. ते आम्हाला जाहीरपणे दाखवता येणार नाही. कारण, अनेक कुटुंब त्यामुळे उद्ध्वस्त होतील. पण, मुख्यमंत्री हे का लपवत आहे? महाराष्ट्राचे नुकसान का करत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Comments are closed.