शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय; शेतकऱ्यांनो यांना धडा शिकवा! वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

राज्यात एकीकडे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढताहेत, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा नाही, पीक विम्याचा भार, कर्जमाफीचाही पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी संकटात असताना दुसरीकडे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात रमी खेळण्यात व्यस्त आहेत. याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी शेअर केला आहे. यानंतर कृषिमंत्र्यांवर चौफेर टीका होत आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही कोकोटा यांच्यावर निशाणा साधला.

शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय. या खोटारड्या, धोकेबाज सरकारला शेतकऱ्यांशी काही देणे घेणे राहिले नाही. म्हणून यांना धडा शिकवा, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी शेतकरी बांधवांना केले.

शेतकरी मरतोय आणि कृषिमंत्री रमी खेळतोय. सरकारमध्ये आनंदी आनंद आहे. जनतेच्या बोकांडी नतद्रष्ट सरकार बसले असून महाराष्ट्राच्या इतिहासात असे सरकार पुन्हा होणार नाही. सरकारला कुणाचीच पर्वा नाही. दररोज 8-10 शेतकरी आत्महत्या करत आहेत. कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दबला आहे. पिकविम्याचे नियम बदलले असून आता पूर्णपणे पिकविम्याचे पैसे शेतकऱ्याला भरावे लागत आहेत. मत घेण्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा, अशी भूमिका सरकार घेत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Comments are closed.