विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारच्या अपयशाची कुंडलीच मांडली; म्
विजय वडेट्टीवार: उद्यापासून सुरू होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रथेनुसार विरोधकांना चहापानाचे आमंत्रण दिले होते. मात्र, या आमंत्रणाला विरोधकांनी बहिष्कार घालत सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली. याबाबत नागपूरमध्ये विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुती सरकारवर (Mahayuti Government) जोरदार टीका केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महायुती सरकारच्या अपयशाची कुंडलीच सादर केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ताधारी पक्षाकडून वैयक्तिक चहापानाचं निमंत्रण काल आम्हाला मिळाले. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि प्रथेने विरोधी पक्षाला निमंत्रण दिले जाते. दुर्दैवाने सत्ताधाऱ्यांची मनसुबा आहे की, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते नाहीत. दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते पद रिक्त आहे. हे दोन्ही पद संविधानिक पद आहे. दोन्ही संविधानिक पदे रिक्त ठेवून संविधानावर अविश्वास दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या चहापानाला जाण्याचे आम्ही टाळले आहे. त्यामुळे आम्ही चहापानावर बहिष्कार टाकत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
Vijay Wadettiwar: सरकारला मनमानी कारभार करायचाय
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात दररोज सहा ते सात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे सांगून मतं घेतली आणि आता तारीख पे तारीख देत आहेत. जूनचा मुहूर्त काढल्याचे सांगितले जात आहे. पण, शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा पत्ता नाही. 1980 भारतीय जनता पक्षाचे 14 आमदार होते. तरीही विरोधी पक्षनेते पद दिले गेले. 1985 साली भारतीय जनता पक्षाचे 16 आमदार होते, तरीदेखील विरोधी पक्ष नेते दिले गेले होते. काँग्रेसने कधीही सत्ताधारी म्हणून संविधानिक पद रिक्त ठेवले नाही. मात्र, या लोकांना विरोधकांची भीती वाटते की काय किंवा सरकारला मनमानी कारभार करायचा आहे. वाटेल त्या पद्धतीने राज्याचा गाडा हाकायचा आणि काम करायचं. त्यामुळे दोन्ही पद रिक्त ठेवून चहा पानाला बोलवत असतील तर त्यावर बहिष्कार टाकलेला बरा. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला.
Vijay Wadettiwar: हे सत्ताधाऱ्यांना भूषणावह आहे का?
कापसावरचा आयात कर 11 टक्क्यांवरून 0 टक्के केल्याने कापूस उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. देशभरात 2014 सालापासून एक लाख 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातील 38.5 टक्के शेतकरी हे महाराष्ट्रातील आहेत. हे सत्ताधाऱ्यांना भूषणावह आहे का? असा विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात 2025 साली पहिल्या आठ महिन्यात 1183 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2024 साली 2706 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे नतभ्रष्ट सरकार आहे. तिघेही जण भांडत आहेत. पण, शेतकऱ्यांकडे यांचे लक्ष नाही. हे म्हणतात की, आम्ही 27 नोव्हेंबरला अतिवृष्टी संदर्भातील मदतीचा प्रस्ताव पाठवला. केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात की, आमच्याकडे प्रस्तावच आला नाही. तो कदाचित गृहमंत्र्यांकडे अडकून पडला होता, अशी देखील काही चर्चा होत आहे. राज्यात शेतकऱ्यांना अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. शेतकरी विरोधी सरकारच्या चहापानाला जाण्याचे औचित्य आम्हाला वाटत नाही, असे देखील विजय वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar: शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे ठरवले असेल तर…
अजित पवार म्हणतात की, हे शेतकरी फुकटे आहेत. भारतीय जनता पक्षातील आणि सत्तेतील नेत्यांनी पदोपदी शेतकऱ्यांच्या भरोशावर मोठे होऊन शेतकऱ्यांचा अवमान करण्याचे ठरवले असेल तर अशा सरकारच्या चहापानाला जाण्याचे आम्ही टाळले आहे. राज्याची तिजोरी खाली झालेली आहे. नऊ लाख 32 हजार कोटी रुपयांचे कर्ज राज्यावर आलेले आहे. यात विशेष करून राज्याच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा जवळपास 22 टक्के कर्ज आणि व्याज फेडण्यात जात आहे. निधी वाटपात सुद्धा प्रचंड भेदभाव होत आहे.संपूर्ण राज्य दिवाळखोरीकडे निघाले आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar: लाडक्या बहिणींचं रक्षण करण्यात सरकार अपयशी
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, लाडकी बहीण, लाडकी बहीण म्हणून पाठ थोपटणाऱ्या सरकारचं लाडक्या बहिणीच्या रक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. राज्यात 18 वर्षाखालील चिमुकल्या असुरक्षित आहेत. 2021 ते 2025 साली राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांचे 37,000 गुन्हे दाखल झालेले आहेत. दररोज 24 अल्पवयीन मुलींची छेड आणि अत्याचाराचे गुन्हे नोंदवले जात आहेत. लाडक्या बहिणींचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरलेले आहे.
Vijay Wadettiwar: सरकार पोलिसांना पाठीशी का घालत आहे?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही सापडत नाही. तो अजून देखील फरार आहे. कोर्टात ते प्रकरण धिम्या गतीने सुरू आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कोर्टाने पोलीस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पोलिसांवर कुठलीही कारवाई होत नाही. सरकार पोलिसांना पाठीशी का घालत आहे? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.