अखेर विराट कोहलीचं ठरलं, 15 वर्षानंतर विजय हजारे ट्रॉफीत खेळणार, DDCA ला कळवलं


नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आगामी विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीकडून खेळताना पाहायला मिळेल. विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळणार की नाही याबाबत तर्क वितर्क सुरु होते. अखेर विराट कोहलीनं  या ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याची माहिती दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनला कळवली आहे. डीडीसीएचे अध्यक्ष रोहन जेटली यांनी याला दुजोरा दिला आहे. विराट कोहलीनं आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीकडून खेळण्यास तयार असल्याची माहिती रोहन जेटली यांनी दिली.

Virat Kohli : विराट कोहली विजय हजारे ट्रॉफीत खेळणार

रोहन जेटली यांनी हिंदुस्थान टाइम्स वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीनं विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असल्याचं कळवलं आहे. तो आमच्यासोबत असेल याची आम्ही वाट पाहत आहोत. विराट कोहली किती मॅचेस खेळेल हे स्पष्ट नाही. मात्र, त्याच्या उपस्थितीमुळं दिल्लीच्या ड्रेसिंग रुममध्ये चांगलं वातावरण असेल, असं रोहन जेटली म्हणाले.

विराट कोहलीनं 2009-10 मध्ये विजय हजारे ट्रॉफीत सहभाग घेतला होता. त्यानंतर राष्ट्रीय संघात व्यस्त असल्यानं तो या स्पर्धेत खेळला नव्हता. कोहलीनं कसोटी आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळं तो आता फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळतोय.

विराट कोहलीचं कमबॅक दिल्लीसाठी फायदेशीर ठरणार आहे. दिल्लीच्या संघांना विविध स्पर्धांमध्ये संघर्ष करावा लागत आहे. विजय हजारे ट्रॉफी 24 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. दिल्ली एलीट ग्रुप ड मध्ये आहे. दिल्लीचे सामने बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम आणि आलूर क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहेत. दिल्लीपुढं आंध्र प्रदेश, गुजरात, सर्व्हिसेस, हरियाणा, सौराष्ट्र या संघांचं आव्हान असेल. विजय हजारे ट्रॉफीत दिल्लीची पहिली मॅच बंगळुरुत आंध्रप्रदेश विरुद्ध असेल. या स्पर्धेत प्रत्येक संघाला सहा मॅच खेळाव्या लागतील.

विराट कोहली जेव्हा दिल्लीकडून खेळेल तेव्हा प्रेक्षक ग्दी करण्याची शक्यता आहे. 2025 च्या सुरुवातीला विराट कोहलीनं दिल्लीकडून एक रणजी ट्रॉफीचा सामना खेळला होता. जवळपास 12 वर्षानंतर विराट कोहली प्रथमश्रेणी क्रिकेट खेळला होता. विराटची फलंदाजी पाहण्यासाठी त्यावेळी 12000 लोक मैदानावर आले होते.

बीसीसीआयनं करारबद्ध क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणं अनिवार्य केलं आहे. खेळाडू दुखापतग्रस्त नसतील किंवा राष्ट्रीय संघासाठी खेळत नसतील तर त्यांनी देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावं असं सांगण्यात आलं आहे. रोहित शर्मा देखील विजय हजारे ट्रॉफीत खेळण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील वनडे मालिका 6 डिसेंबरला संपणार आहे. भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरु होणार आहे. दरम्यानच्या काळात विराट कोहली दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफीत तीन सामने खेळू शकतो. मात्र, विराट कोहली कोणत्या मॅचेस खेळणार हे स्पष्ट झालं नाही.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.