विराट कोहलीची नजर सचिन तेंडुलकरच्या आणखी एका विश्वविक्रमावर, जाणून घ्या सविस्तर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विशाखापट्टणम येथे झालेल्या मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात विराट कोहलीच्या बॅटने पुन्हा एकदा आग ओकली. सुरुवातीच्या दोन्ही वनडे सामन्यांमध्ये शतक झळकावणाऱ्या ‘किंग कोहली’ने तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात 45 चेंडूंचा सामना केला आणि सहा चौकार व तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 65 धावांची खेळी केली. कोहलीने जयस्वालसोबत दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 116 धावांची भागीदारी केली. तिसऱ्या वनडेतील विजयाचे रन कोहलीच्या बॅटमधून आले. ‘रन मशीन’ विराट कोहलीला वनडे मालिकेतील त्याच्या कामगिरीसाठी ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा पुरस्कार देण्यात आला आणि हा किताब जिंकताच कोहलीने ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा किताब जिंकण्याचा विक्रम रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत त्याने 151 च्या सरासरीने 302 धावा केल्या.

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत विराट कोहलीला 22 व्यांदा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा किताब देण्यात आला आहे. त्याच्यापूर्वी कोणत्याही क्रिकेटपटूला इतक्या वेळा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’चा पुरस्कार जिंकता आलेला नाही. कोहलीने वनडेमध्ये 12 वेळा (२०२३ विश्वचषकातील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’सह), कसोटीमध्ये 3 वेळा आणि टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 7 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

प्लेअर ऑफ द सीरीज’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा जिंकण्याच्या बाबतीत कोहलीने यापूर्वीच सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत 20 वेळा हा किताब जिंकला होता. दुसरीकडे, बांगलादेशचा शाकिब अल हसन (17)या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर जॅक कॅलिस (15) चौथ्या क्रमांकावर आणि डेव्हिड वॉर्नर व सनथ जयसूर्या (13) हे या यादीत संयुक्तपणे पाचव्या क्रमांकावर आहेत.

‘किंग कोहली’चे लक्ष आता वनडे फॉरमॅटमध्ये सचिन तेंडुलकरला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ पुरस्काराच्या बाबतीत मागे टाकण्यावर आहे. शनिवारी कोहलीला मिळालेला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ पुरस्कार, त्याच्या वनडे कारकिर्दीतील 12 वा पुरस्कार आहे. त्याने सनथ जयसूर्याला मागे टाकले आहे आणि आता तो दुसऱ्या स्थानावर आला आहे. सचिन तेंडुलकरने वनडेमध्ये 15 वेळा ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ पुरस्कार जिंकला आहे. जयसूर्याने हा पुरस्कार 11 वेळा जिंकला आहे. क्रिस गेल आणि शॉन पोलॉक यांनी प्रत्येकी 8-8 वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

Comments are closed.