IND vs ENG: चौथ्या कसोटीत रिषभ पंत खेळणार का? दुखापतीबाबत स्वतः दिली मोठी अपडेट

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत (Rishbh Pant) इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत खेळणार की नाही, हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. लॉर्ड्समध्ये विकेटकीपिंग करताना पंत जखमी झाला होता. त्यानंतर त्याच्या जागी ध्रुव जुरेलने (Dhruv jurel) विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळली होती. पण, पंतने त्या सामन्यातील दोन्ही डावांत फलंदाजी केली होती.

रिषभ पंतने (Rishbh Pant) स्वतःच आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो अगदी फिट दिसत आहे. सुरुवातीला तो फुटबॉल खेळताना दिसतो आणि त्यानंतर फील्डिंग आणि बॅटिंगचा सराव करतानाही दिसतो. मात्र, व्हिडिओमध्ये तो कुठेही विकेटकीपिंग करताना दिसलेला नाही आणि हाच मुद्दा टीम इंडियासाठी चिंता निर्माण करणारा आहे.

पंतने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, जर शांततेला आवाज असता, तर तो असाच असता.
सध्या तरी पंतच्या फिटनेसबाबत संघ व्यवस्थापनाकडून कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही.

लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात पंतने जबरदस्त खेळी करत 74 धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात तो फारशी चमक दाखवू शकला नाही आणि फक्त 9 धावा करून बाद झाला.

इंग्लंडची खेळपट्टी आणि वातावरण रिषभ पंतसाठी खूपच अनुकूल ठरलं आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावांमध्ये शतकं ठोकत जबरदस्त खेळी केली होती. एजबेस्टन आणि लॉर्ड्समध्येही त्याची कामगिरी चांगली झाली. आत्तापर्यंत या तीन कसोटींतील 6 डावांमध्ये त्याने 70 च्या सरासरीने 425 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. हीच कामगिरी पाहता संघ व्यवस्थापन रिषभ पंत लवकरात लवकर पूर्णपणे फिट व्हावा, यासाठी प्रार्थना करत आहे.

Comments are closed.