महाराष्ट्राप्रमाणे बंगालमध्येही राजकीय खेळ, तृणमूलचे 20 खासदार भाजपसोबत गेल्याप्रकरणी अरविंद सावंत यांची टीका

तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षाला कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार अरविंद सावंत यांनी सोमवारी भाजपवर जोरदार टीका केली. तृणमूल काँग्रेसच्या 20 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत सत्ताधारी पक्षावर विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा आरोप केला.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना सावंत म्हणाले, “सध्या तृणमूल पक्षात जे काही घडत आहे, त्याचा कटू अनुभव आम्ही महाराष्ट्रात घेतला आहे. कुणाच्या तरी पाठबळाशिवाय असे घडू शकत नाही. ज्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलात, तो पक्ष सोडण्याचे धाडस कसे होते? त्यातून काहीतरी लाभ मिळत असणार. सत्ताधारी भाजप हा अत्यंत वाईट राजकीय खेळ खेळत आहे. ही अत्यंत दुर्दैवी परिस्थिती आहे.”

जनतेने विशिष्ट पक्षाच्या विचारधारेवर आणि चिन्हावर विश्वास ठेवून प्रतिनिधींना निवडून दिलेले असते. त्यामुळे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी मतदारांनी दिलेल्या कौलाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असेही सावंत यांनी सांगितले.

“तुम्ही एका पक्षाकडून निवडून येता, सामान्य जनतेला न्याय देण्याची जबाबदारी तुमच्यावर असते, पण त्याच गोष्टीचा विसर पडत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला राजकीयदृष्ट्या एकाकी पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत सावंत म्हणाले, “आता टीएमसीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे, जेणेकरून त्यांच्यासमोर कोणी उभे राहू शकणार नाही.”

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यावरही निशाणा साधला. “सुवेंदू अधिकारी मूळचे टीएमसीचेच नेते आहेत. त्यांच्यावर सर्वाधिक भ्रष्टाचाराचे आरोप कोणी केले होते? देशाच्या पंतप्रधानांनीच. आणि आज तेच बंगालचे मुख्यमंत्री झाले.” असेही अरविंद सावंत म्हणाले.

Comments are closed.