ठाकरेंच्या शिवसेना पक्षातून जे आऊटगोइंग सुरू आहे, त्यावर उपाय काय? संजय राऊतांच्या प्रश्नावर ठा
नाशिक: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय घडामोडी घडल्या. नाराजीनाट्य, पक्षातून हकालपट्टी, पक्षांतर यासह अनेक मोठ्या घडामोडींनी राजकारण ढवळून निघालं. अशातच त्याचबरोबर आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवकांनी पक्षांतर देखील केलं. या सर्व घडामोडींमध्ये मोठं खिंडार पडलं ते शिवसेना ठाकरे गटाला. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने नाशिकमधील ठाकरे गटाची अख्खी संघटना खिळखिळी केली त्यावरती सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्पष्टपणे भाष्य केलं आहे.
चला एक ‘बला’ गेली!
संजय राऊतांच्या, आपल्या पक्षातून जे आऊटगोइंग सुरू आहे, त्यावर उपाय काय? या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, ‘काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडासा आऊटलेट द्यावा लागतो आणि नवीन झरा यावा लागतो. कधी कधी भावनेच्या भरात किंवा प्रेमापोटी एखादा माणूस अयोग्य असला तरी आपण बाजूला करत नाही, पण जेव्हा तो स्वतःहून जातो आणि त्याची जागा दुसरा घेतो तेव्हा बरं वाटतं की, चला एक ‘बला’ गेली! आता जे आमच्यातून गेले ते तिकडे जाऊन काय दिवे लावताहेत ते तुम्ही बघताच आहात. त्यामुळे असे हे दिवटे गेलेले बरे’, असंही पुढे उध्दव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, त्यातले काही गेले
शिवसेना हा एक विचार होता आणि आहे. शिवसेना हे लोहचुंबक आहे असे बाळासाहेब म्हणायचे. एक विचार म्हणून लोक त्याला चिकटून राहायचे. त्या चुंबकाचा असर कमी झालाय का? या प्रश्नावर उत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, सर्वसामान्य जनता आणि साधा कार्यकर्ता जो कधी काही मागण्यासाठी माझ्याकडे किंवा शिवसेनाप्रमुखांकडे आलाच नव्हता. त्यांच्या पिढ्यान्पिढ्या आजही शिवसेनेसोबत आहेत. कुठलीही ओळख नसताना ज्यांना शिवसेनेनं मोठं केलं, त्यातले काही गेले, पण त्यांना मोठं करणारे अजूनही माझ्यासोबत आहेत. हीच माझी शक्ती आहे आणि तीच यांची खरी पोटदुखी आहे की, इतकं करूनही हे संपत कसे नाहीत? असंही ते पुढे म्हणालेत.
ठाकरे हा नुसता ब्रँड नाही तर…
हा जो ठाकरे ब्रँड आपण म्हणतोय, ‘ब्रँड’ हा शब्द इंट्रेस्टिंग आहे. जगात अनेक मोठमोठे ब्रँड व्यवसायात, उत्पादनात, व्यापारात येतात. मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संघर्ष करतात. तरी हा ठाकरे ब्रँड 50 वर्षांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणात टिकून राहिला. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ठाकरे हा नुसता ब्रँड नाही. हा ब्रँड म्हणजे महाराष्ट्राची, मराठी माणसाची, हिंदू अस्मितेची ओळख आहे. ही ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न काहींनी केला. पुसू इच्छिणारे पुसले गेले. अनेक आले, अनेक गेले. जनतेने त्यांना पुसून टाकले.
असं काय आहे ठाकरे ब्रँडमध्ये? तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन समाजकारणात, राजकारणात आहे. यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, ते आम्ही कसं सांगणार? ते जनतेने सांगायला पाहिजे. आज माझ्याकडे देण्यासारखं काही नाही. तरीसुद्धा कुठेही गेलं तरी लोक प्रेमाने, आपुलकीने स्वागत करतात. बोलायला येतात. जे घडतंय त्याबद्दल संताप, हळहळ व्यक्त करतात. काही झालं तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगतात.
हा ब्रँड संपवण्यासाठी दिल्लीपासून महाराष्ट्रात अनेक लोक कामाला लागलेत की, आता आम्ही हा ब्रँड संपवणारच, यावर बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, होय, खरं आहे. ठाकरे ब्रॅण्ड संपवण्यासाठी अनेक बॅण्ड वाजताहेत. कारण त्यांना स्वतःशिवाय देशात कोणतंही अन्य नाव नको आहे. स्वतःची तुलना ते देवाबरोबर करायला लागलेत. बॅलेट पेपरवर मतदान घ्या, मग काय व्हायचं ते होऊ द्या!
आणखी वाचा
Comments are closed.