माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी मविआच्या खासदारांनी दिल्लीतील ‘मामा’ कनेक्शन वापरलं, थेट क

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळाच्या सभागृहात रमी सर्कल खेळतानाचा व्हिडीओ सोशल मिडीया ‘एक्स’वरती शेअर केला आहे. यामध्ये माणिकराव कोकाटे मोबाईलच्या स्क्रीनवरती रमी सर्कलवरती गेम खेळत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओनंतर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे, तर या व्हिडीओवरती कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की ती फक्त जाहीरात आली होती, मला रमी गेम खेळताही येत नाही.त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको, अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

विधानसभेत रमी खेळणारा सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे, पोस्टमध्ये सुप्रिया सुळेंनी म्हटलंय, ‘महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने आणि वर्तणूकीमुळे चर्चेत आहेत. शेतकऱ्यांना अरेरावी करण्याचा प्रसंग असो की कर्जमाफीच्या संदर्भात केलेले विधान असो. त्यांनी आपल्या विधानांमुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फासण्याचे काम केले आहे. त्यांच्या या असंवेदनशील वागण्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान तर होत आहेच तसेच राज्याच्या उज्ज्वल परंपरेला धक्का देखील बसत आहे. म्हणूनच त्यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्याऐवजी संवेदनशील आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा संवेदनशील कृषीमंत्री महाराष्ट्राला द्यावा अशी मागणी केली’, अशी पोस्ट सुळेंनी शेअर केली आहे.

कोणकोणत्या नेत्यांनी घेतली भेट

मणिकराव कोकटेंचा राजीनामा घ्यावा यासाठी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भेटून महाविकास आघाडीचे खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, विशाल पाटील, अरविंद सावंत, बजरंग सोनावणे, अमोल कोल्हे, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर यांनी विनंती केली आहे.

माणिकराव कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना काय म्हटलंय?

माणिकराव कोकाटे म्हणाले की, हा छोटा विषय आहे. हा विषय एवढा लांबला का? हे कळत नाही. ऑनलाइन रमी तुम्हाला माहिती आहे का? त्याला बँकेचे खाते जोडावे लागते. माझा असा कोणताही मोबाईल नंबर आणि बँक अकाऊंट ऑनलाईन रमीच्या अॅप्लिकेशनला जोडलेला नाही. कुठेही चौकशी करा. ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरु झाली आहे, तेव्हापासून मी एक रुपयाची रमी खेळलेली नाही. किंबहुना मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे माझी महाराष्ट्रात बदनामी झाली आहे. कारण असताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे, ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आहे, ज्यांना माझी बदनामी केली आहे, त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिलाय.

माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही

माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, मी त्यादिवशी सभागृहात होतो, माझं काम होतं. मला माझ्या ओएसडीकडून माहिती हवी असेल तर मला एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्यांना सभागृहात आत येत नाही. त्यासाठी मी एक मोबाईल मागवला होता. मोबाईल उघडल्यावर त्याच्यावर तो गेम आला, त्या गेमचा सारखा पॉप-अप येतो. तो मला स्कीप करता आला नाही. तो मोबाईल माझ्यासाठी नवीन होता म्हणून मला गेम स्कीप करायला वेळ लागला. पण मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो तुम्ही दाखवलाच नाही. मोबाईलवर एकच गेम येत नाही, वेगवेगळे गेम येतात. 30 सेकंद गेम स्कीप करता येत नाही. माझा व्हिडिओ 11 सेकंदांचा आहे. त्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते, असे त्यांनी देखील यावेळी म्हटले.

दोषी असेल तर राजीनामा देतो

मी आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे तुम्ही चौकशी करावी. मी ऑनलाईन रमी खेळत असेन, मी दोषी सापडलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणाला न थांबता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याला न भेटता मी राज्यपालांकडे जाऊन माझा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा

Comments are closed.