रिषभ पंतची होणार हकालपट्टी? लखनौच्या फ्लॉप शो नंतर या दिग्गजाने केले मोठे विधान, म्हणाले…

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. लखनौनै त्याला २७ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. त्यानंतर त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली होती. पण त्याच्या नेतृत्वाखाली लखनौला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्यावेळी देखील लखनौचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नव्हता. यावेळी देखील हा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी राहिला आहे. त्यामुळे ऋषभ पंतला कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान लखनौ सुपर जायंट्स संघाचे क्रिकेट डायरेक्टर टॉम मूडी यांनी ऋषभ पंतच्या कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

लखनौ सुपर जायंट्सचे या हंगामातील १४ सामने पूर्ण झाले आहेत. गुणतालिकेत हा संघ सर्वात शेवटी राहिला आहे. दरम्यान या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत टॉम मूडी म्हणाले की, “मला असं वाटतं, अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर तुम्ही बोटू ठेवू शकता. माझ्या मते, स्पर्धेतील सुरुवातीच्या टप्प्यात आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. पण दुर्दैवाने, सुरुवातीच्या टप्प्यात किंवा निम्म्याहून अधिक हंगामात आमचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. आम्हाला ज्या सुरुवातीची गरज होती, तशी सुरुवात मिळू शकली नाही. मधली फळी देखील योगदान देण्यात अपयशी ठरली. त्यामुळे, फलंदाजी आणि गोलंदाजीत एकाच वेळी सर्वोत्तम कामगिरी करणं हे मोठे आव्हान होते.”

तसेच ऋषभ पंतच्या कर्णधारबाबत बोलताना टॉम मूडी म्हणाले,“कर्णधारपदाबाबत बोलायचं झालं तर, हे आव्हान कठीण होतं. हे संघाच्या निकालावरुन तुम्हाला दिसून येईल. या दबावाचा परिणाम त्याच्या फलंदाजीतील कामगिरीवरही दिसून आला. मला माहीत आहे, हे हंगाम आमच्यासाठी खूप कठीण होते. पण आम्ही यावर सखोल विचार करु. आम्ही पुरेसा वेळ घेऊ आणि आत्मपरीक्षण करु. सर्व बाजूंचा नीट विचार करु.”

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळताना लखनौ सुपर जायंट्स संघाचा फ्लॉप शो पाहायला मिळाला आहे. साखळी फेरीतील लखनौचा शेवटचा सामना पंजाब किंग्स संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यातही लखनौला पराभवाचा सामना करावा लागला. १४ पैकी केवळ ४ सामन्यांमध्ये लखनौला विजय मिळवता आला. तर १० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

Comments are closed.