‘अनोळखी’ एकांकिकेने मारली बाजी, ठाण्यात रंगली ‘उत्तरार्ध’ एकांकिका स्पर्धा
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ‘उत्तरार्ध एकांकिका स्पर्धे’ची अंतिम फेरी पार पडली. या अंतिम फेरीत पन्नाशी पार केलेल्या तरुणांनी पाच एकांकिका सळसळत्या उत्साहात सादर केल्या. त्यात मित्र सहयोग गटाच्या ‘अनोळखी’ या एकांकिकेने ‘सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध’ हा प्रथम पुरस्कार पटकावला. रंगा थिएटर्सच्या ‘तरुणाई’ ने द्वितीय, तर ठाणे आर्ट गिल्ड यांच्या ‘ती येते आणिक जाते’ या एकांकिकेने तृतीय पारितोषिक पटकावले आहे.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, ठाणे शाखेच्या सहकार्याने आणि मोरया इव्हेंट्स अॅण्ड एंटरटेनमेंट यांच्या आयोजनाने ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये ‘ती येते आणिक जाते’ या एकांकिकेने उत्तम सादरीकरण करत तृतीय क्रमांकासह लेखन, दिग्दर्शक, अभिनेत्री, संगीत आणि नेपथ्य तब्बल सहा पारितोषिके पटकावली आहेत.
स्पर्धेचे परीक्षण लेखक-दिग्दर्शक विनोद जाधव, अभिनेता संदीप रेडकर आणि अभिनेत्री योगिनी चौक यांनी केले. यावेळी लेखक-दिग्दर्शक विशाल कदम, दिग्दर्शक अनिल बांदिवडेकर, अभिनेत्री शीतल कुलकर्णी-रेडकर, ज्येष्ठ अभिनेत्री संजीवनी समेळ, अभिनेत्री संपदा जोगळेकर, नाटय़ परिषद, ठाणे शाखेचे पदाधिकारी नरेंद्र बेडेकर, विद्याधर ठाणेकर, सॉफ्ट कॉर्नरचे एमडी व सीईओ दिलीप कुलकर्णी यांच्यासह ठाण्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed.