अवतीभवती – सांगलीची ‘स्टील भांडी बँक’
>> पराग पोतदार
सांगली-मिरजमध्ये ‘स्टील भांडी बँक’ या पर्यावरणपूरक उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध कौटुंबिक सोहळ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वापरल्या जाणाऱया सिंगल-युज प्लास्टिकला आळा घालण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रात अभिनव ‘स्टील भांडी बँक’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पृथ्वी वेस्ट झिरो फाउंडेशन, विविध सामाजिक संस्था, बचत गट आणि प्रशासनाच्या संयुक्त पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमांमध्ये वापरल्या जाणाऱया प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळ्या, द्रोण, ग्लास आणि चमच्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होतो. हा कचरा कमी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे, हा भांडी बँकेचा प्रमुख उद्देश आहे.
या भांडी बँकेमध्ये नागरिकांना कार्यक्रमांसाठी स्टीलची ताटे, वाटय़ा, ग्लास, चमचे तसेच मोठे पाण्याचे जार फक्त डिपॉजिट ठेऊन उपलब्ध करून दिले जातात. कार्यक्रम झाल्यानंतर नागरिकांनी भांडी स्वच्छ धुवून पुन्हा बँकेत जमा करायची असतात. कोणतेही पैसे न आकारता दिलेली भांडी परत करताना ऐच्छिक देणगी तुम्ही देऊ शकता.
या उपक्रमामुळे कार्यक्रमानंतर निर्माण होणारा प्लास्टिक कचरा मोठय़ा प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर डिस्पोजेबल वस्तूंवर होणारा खर्च आणि कचऱयाची विल्हेवाट लावण्याचा त्रासही कमी होत आहे.
सांगली आणि मिरज शहरातील पर्यावरणाबाबत जागरूक नागरिक छोटय़ा-मोठय़ा कार्यक्रमांसाठी या सुविधेचा लाभ घेत आहेत. महानगरपालिका प्रशासनानेही नागरिकांना प्लास्टिक व थर्माकोलच्या पत्रावळ्या, द्रोण आणि ग्लास टाळून स्टीलच्या भांडय़ांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.
‘वापरा, धुवा आणि पुन्हा वापरा’ या संकल्पनेवर आधारित हा उपक्रम प्लास्टिकमुक्त शहराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरत असून, नागरिकांचा सहभाग वाढल्यास त्याचा पर्यावरणावर मोठा सकारात्मक परिणाम होत आहे.
Comments are closed.