आरोग्य अपडेट: कर्करोगावरील संशोधन ‘3-डी मॉडेल्स’वर केले जाणार? ‘2D’ आता मागे पडेल; आयआयटी मुंबईच्या अभ्यासातून नवी दिशा.

आयआयटी मुंबई येथील संशोधक या निष्कर्षावर पोहोचले आहेत की, कर्करोग संशोधनासाठी आतापर्यंत वापरल्या जाणाऱ्या द्विमितीय प्रयोगशाळा मॉडेलपेक्षा त्रिमितीय (3D) मॉडेल अधिक प्रभावी ठरू शकते . हे संशोधन कर्करोग संशोधनातील एक मैलाचा दगड मानले जात आहे. संशोधकांनी सांगितले की, या अभ्यासात ग्लिओब्लास्टोमा या आक्रमक मेंदूच्या कर्करोगाच्या 3D ट्युमोरिजेनिक मॉडेलचा आणि मेंदूसारख्याच एका मऊ वातावरणाचा वापर करून कर्करोगाचे खरे स्वरूप आणि त्यामागील जैविक प्रक्रिया स्पष्टपणे दाखवण्यात आल्या. हे संशोधन आयआयटी मुंबई येथील प्रा. अभिजित मजुमदार यांच्या मेकॅनोबायोलॉजी प्रयोगशाळेने टाटा मेमोरियल सेंटर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर यांच्या सहकार्याने केले. या संशोधनात पारंपरिक कठीण प्लास्टिकच्या पृष्ठभागावर आणि त्रिमितीय ट्युमोरिजेनिक मॉडेलवर वाढवलेल्या कर्करोगाच्या पेशींची तुलना करण्यात आली. (फोटो सौजन्य – आयस्टॉक)

परिणामकारकता तपासण्यासाठी ३डी मॉडेल

संशोधकांना असे आढळून आले की, 3D ट्युमरॉइड्समध्ये वाढवलेल्या पेशींमध्ये कर्करोगाशी संबंधित रेणू NEAT1 आणि MALAT1 यांची पातळी लक्षणीयरीत्या वाढली होती. प्रयोगांमधून हेही दिसून आले की, जेव्हा या रेणूंना नियंत्रित केले गेले, तेव्हा कर्करोगाच्या पेशींची वाढ, प्रसार आणि आक्रमकता कमी झाली. याउलट, पारंपरिक 2D मॉडेलमध्ये हे महत्त्वाचे बदल स्पष्टपणे दिसून आले नाहीत.

संशोधकांच्या मते, वास्तविक शरीरातील कर्करोग त्रिमितीय असतो. त्यामुळे, सपाट पृष्ठभागावरील संशोधनातून अनेकदा रोगाचे संपूर्ण चित्र दिसत नाही. ट्यूमरॉइड्स पेशींमधील आंतरक्रिया, वाढ आणि प्रसाराचे अधिक वास्तववादी चित्र देतात. त्यामुळे, भविष्यात कर्करोगाच्या औषधांची परिणामकारकता तपासण्यासाठी आणि औषधांसाठी नवीन लक्ष्ये शोधण्यासाठी ३डी मॉडेल्सचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो.

संयुक्त संशोधन यश

  • आयआयटी मुंबई, टाटा मेमोरियल सेंटर आणि आयआयएससी यांचे संयुक्त संशोधन.
  • ‘2D’ आणि ‘3D’ मॉडेल्सची तुलनात्मक चाचणी.

“कर्करोगाचे वर्तन समजून घेण्यासाठी केवळ जनुकेच नव्हे, तर पेशींचे भौतिक वातावरण देखील तितकीच महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे, भविष्यातील कर्करोग संशोधनात सॉफ्ट जेल आणि ३डी ट्युमरॉइड्सचा समावेश करणे आवश्यक असू शकते,” असे प्रा. अभिजित मजुमदार म्हणाले.

Comments are closed.