‘एस-400’चा चौथा संच मे अखेरपर्यंत – TMarathiNews

रशियाकडून मिळणार, राजस्थानात स्थापन होणार

वृत्तसंस्था

जगात सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या ‘एस-400’ या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेचा चौथा संच भारताला येत्या मे अखेरीपर्यंत मिळणार आहे. ही यंत्रणा वाहक नौकांवर चढविण्याच्या कामाला रशियात प्रारंभ करण्यात आला आहे. ही यंत्रणा राजस्थानात भारत-पकिस्तान सीमेवर स्थापन केली जाणार आहे. या यंत्रणेचे खरेदीपूर्व परीक्षण भारतीय वायुदलाच्या तज्ञांनी केले आहे. त्यानंतर आता ही यंत्रणा भारताला देण्यासाठी सर्व सज्जता करण्यात आली असल्याचे दिसून येते.

ही रशियन यंत्रणा असून तिचे उत्पादन पूर्ण करण्यात आले आहे. तिची पाठवणी भारतात करण्यासाठी गेल्या आठवड्यापासूनच रशियाने सज्जता चालविली आहे. या यंत्रणेचे सुटे भाग वाहक नौकांवर शास्त्रशुद्ध पद्धतीने चढविण्यात येत आहेत. या कामासाठी आणखी एक आठवडा लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर, या यंत्रणेच्या भारताकडच्या प्रवासास प्रारंभ होईल. साधारण दोन आठवड्यांमध्ये ती भारतापर्यंत पोहचणार आहे. मे महिन्याच्या अखेरीपर्यंत तिची भारतात जुळणी केली जाईल आणि नंतर राजस्थानात विशिष्ट स्थानी ती स्थापन करण्यात येईल.

पाच संचांसाठी करार

या यंत्रणेचे पाच संच भारत रशियाकडून विकत घेणार आहे. तसा करार गेल्या वर्षी करण्यात आला होता. भारताने पाकिस्तानच्या विरोधात यशस्वी केलेल्या ‘सिंदूर अभियाना’त या यंत्रणेने मोलाचे योगदान केले आहे. त्याच अभियानात या यंत्रणेचे प्रभावीपण अणि उपयुक्तता सिद्ध झाली होती. त्यामुळे भारताने तिचे पाच संच घेण्यासाठी करार केला. त्यांपैकी तीन संच मिळाले असून ते कार्यरतही करण्यात आले आहेत. चौथा संच मे अखेरीपर्यंत मिळणार असून पाचवा संच यावर्षीच्या नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

क्षेपणास्त्रेही घेणार

भारत रशियाकडून 280 ते 300 लघु, मध्यम आणि दीर्घ पल्ल्यांची क्षेपणास्त्रेही घेणार आहे. ‘सिंदूर अभियाना’च्यावेळी उपयोगात आणल्या गेलेल्या क्षेपणास्त्रांची भरपाई करण्यासाठी ही क्षेपणास्त्रे घेण्यात येणार आहेत. तसेच भारत अशा क्षेपणास्त्रांचा पुरेसा साठा करुन ठेवणार आहे. तो तातडीच्या प्रसंगी उपयोगात आणला जाऊ शकतो, असेही भारतीय वायुदलाने मंगळवारी स्पष्ट केलेले आहे.

खासगी क्षेत्राचाही समावेश

‘एस-400’ यंत्रणेची हाताळणी, रखरखाव, दुरुस्ती आणि ओव्हरहाउल यासाठी संरक्षण विभाग खासगी क्षेत्रालाही सहभागी करुन घेणार आहे. तसेच ही यंत्रणा निर्माण करण्याचे तंत्रज्ञानही रशिया भारताला हस्तांतरीत करण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास भारत भविष्यकाळात या यंत्रणेचे उत्पादन स्वबळावर करु शकणार आहे. तसेच या यंत्रणेच्या पुढच्या सुधारित आवृत्त्याही विकसीत होऊ शकतील.

मोठ्या संरक्षण खरेदीसाठी अनुमती

संरक्षण विभागाच्या शस्त्रसंपादन विभागाने गेल्या मार्चमध्ये 2.3 लाख कोटी रुपयांच्या संरक्षण साधन खरेदीला अनुमती दिली आहे. या साधनांमध्ये ‘एस-400’ या यंत्रणेचाही समावेश आहे. याखेरीज युद्धविमाने, अत्याधुनिक ड्रोन्स, क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक मशिनगन्स, संपर्क यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री इत्यादी अनेक साधने भारत येत्या पाच वर्षांमध्ये खरेदी करणार असून त्यामुळे भारताच्या सामरिक सामर्थ्यामध्ये मोठी भर पडणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

कोठे स्थापन करणार…

रशियायकडून विकत घेतल्या जाणाऱ्या या यंत्रणेचे संच भारताच्या तीन्ही दलांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. तीन संच यापूर्वीच पूर्वनिर्धारीत स्थानांवर स्थापन करण्यात आले आहेत. चौथा हा संच भारताच्या पश्चिम सीमेवर राजस्थानच्या नजीक स्थापन केला जाणार आहे, अशी माहिती संरक्षण विभागानेही दिली आहे.

काय आहेत ‘एस-400’ची वैशिष्ट्यो…

ड आकाशात 400 किलोभीटर अंतरावरच शत्रूची क्षेपणास्त्रे होतात नष्ट

ड क्षेपणास्त्रांप्रमाणेच ड्रोन्स किंवा इतर शस्त्रांचाही आकाशातच होता विनाश

ड शत्रूच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ला करण्याचीही क्षमता, वेगवान लक्ष्यभेद

ड शत्रूची क्षेपणास्त्रे किंवा, उडती शस्त्रे यांचा अचूक वेध घेण्यास सक्षम यंत्रणा`

Comments are closed.