ऐकावे जनांचे…सर्व काही समष्टीसाठी…
>> अक्षय मोटेगावकर
आपण जे ऐकतो, पाहतो त्यातून समृद्ध होण्याचा आनंद लेखनातून मांडता येणे हीच या सदराची खास ओळख. वैविध्यपूर्ण लेखनातून उमजलेल्या समाधानाच्या जाणिवेची ही समष्टी.
आपण चांगल्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाऊन आलो, चांगलं एखादं पुस्तक वाचलं, छानसा एखादा चित्रपट पाहिला किंवा एखादा मस्त कार्यक्रम पाहिला तर आनंद वाटला की, तो दुणावतो या म्हणण्याप्रमाणे आपण जवळच्या मंडळींना ते आवर्जून सुचवतो. तसेच ज्या वेळेस मी काही चांगले पॉडकास्ट, चांगली भाषणं ऐकली आणि त्याच्या नोंदी मी फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर केल्या, त्या वेळेस खूप लोकांना ते आवडले आणि त्यातूनच ‘ऐकावे जनांचे’ या सदराची कल्पना गुंफली गेली.
मराठी भाषेतील अमुक तमुक, आरपार, व्हायफळ, कॅच अप विथ अमोल परचुरे, आवाहन आयपीएच, वैचारिक किडा, थिंक बँक यासारखे पॉडकास्ट असतील, निनाद बेडेकर, अविनाश धर्माधिकारी यांची भाषणे असतील, हिंदी भाषेतील मनोज मुंतशीर, डॉक्टर कुमार विश्वास, संदीप मानुधने यांचे प्रोफेशनल टय़ुटोरियल्स, जिंदगी विथ रिचा, शुभंकर मिश्रा, राज शमानी, समाधीश भाटिया, नीलेश मिश्रा, चिन्मय मिशन, लक्ष्य माहेश्वरी, सोनल कौशल यांचे पॉडकास्ट, इंग्रजीतील डॉ. अनिल लांबा, सिमोन सिनेक आणि टेड टॉक्स असतील या सगळ्या पॉडकास्टस्, भाषणांनी व्यक्तिशः मला खूप आनंद दिला. मोठा विरंगुळा दिला आणि माझी जगण्याकडे पाहण्याची दृष्टीच विस्तारून टाकली. मला विचारांनी समृद्ध केले.
हा समृद्ध होण्याचा आनंद, हे समाधान सर्वांसोबत वाटता आले. या प्रवासात खूप साऱया प्रतिक्रिया मिळाल्या. वेगवेगळ्या विषयांमध्ये रस असणाऱया मंडळींना त्यांच्या आवडीचे वैचारिक खाद्य मिळाले. काही वेळेस या पॉडकास्टस्मध्ये मांडलेल्या मतांवरून मतमतांतरे पाहायला मिळाली, मतभेद आढळले, पण हे मतभेद मला आपण समाज म्हणून जिवंत असल्याचे लक्षण वाटते. कारण यातूनच चांगल्या वाईट गोष्टींबाबत विचार मंथन सुरू होते. आपले समाजभान शाबूत असल्याची हमी मिळते. अर्थात प्रत्येकाने आपला नीरक्षीर विवेक वापरून, तर्काच्या कठोर आगीतून तावून सुलाखूनच आपले मत बनवावे. ऐकलेल्या किंवा लेखात मांडलेल्या प्रत्येक पॉडकास्ट, भाषणांमधील प्रत्येक मत, प्रत्येक विचार मलादेखील पटलेला आहे असेही नाही, पण लोलकातून जाणारा प्रकाश वेगवेगळ्या दिशांना पसरताना त्या प्रत्येक प्रकाश शलाकेने चित्त वेधून घ्यावं तसा प्रत्येक विचार मला महत्त्वाचा वाटतो.
मासे आणि इतरांना पाणी आणि दूध यातील फरक कळत नाही
कीर्ती ही हंसाची कीर्ती आहे जी पुण्यवानांना प्राप्त होते
या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ही नीरक्षीर विवेकाची देणगीच हंसाला (या युगात मनुष्यप्राण्याला) इतरांपेक्षा वेगळे, यशस्वी आणि श्रेष्ठ बनवते.
ऐकावे जनांचे… ही खरंतर कोरोना काळातील आपत्तीतून जन्माला आलेली इष्टापत्ती. या ऐकण्याच्या प्रवासात जगातील वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करणारी मंडळी, त्यांची अभ्यास करण्याची पद्धत, त्यांचे अनुभव जाणून घेताना या झेप घेणाऱया मंडळींचे पाय घट्ट जमिनीवर असू शकतात हे आपण सदैव कसे लक्षात ठेवले पाहिजे हे कळले. प्दै ब्दल् ज्rाsाहू ग्s as ग्स्ज्दूहू as wप्at ब्दल् ज्rाsाहू चे महत्त्वदेखील पुन्हा ठसले. खूप साऱया गोष्टींमधील अभ्यास किती पटीने वाढवावा लागणार आहे, याची एक ठसठशीत जाणीव झाली.
निनाद बेडेकर आणि संदीप मानुधने यांच्यामुळे इतिहासाकडे अजून विस्ताराने आणि जाणीवपूर्वक पाहण्याची निकड जाणवली. डॉ. आनंद नाडकर्णींच्या वेगवेगळ्या पॉडकास्टस्मुळे प्रेरणा तर मिळालीच, पण समाजाच्या सगळ्यात पायाभूत स्तरावर काम करणाऱया मंडळींच्या अडचणी समजून घेता आल्या. कुमार विश्वास, मनोज मुंतशीर नीलेश मिश्रा, सौरभ द्विवेदी, रिचा अनिरुद्ध या मंडळींमुळे हिंदी साहित्याकडे ओढा वाढला, डॉ. लांबांमुळे वित्त व्यवस्थापन गंभीरपणे घेण्याचे समजले. सायमन सिनेकमुळे ‘का?’ किती महत्त्वाचा आहे हे उमगले. आता हे सदर इथे थांबेल, पण हा ‘ऐकावे जनांचे’चा तुमचा आणि माझा प्रवास अखंड चालू राहो. समाजातूनच हे माझ्यापर्यंत आले आणि माझ्याकडून पुन्हा तुमच्यापर्यंत. अर्थात सर्व काही समष्टीसाठी. त्यामुळे आता याला तात्पुरता विराम!
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)
Comments are closed.