घरफोडीच्या पैशातून चोरटा गर्लफ्रेंडला घेऊन गोव्याला; नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या

घरफोडी केलेल्या पैशातून मौजमजा करण्यासाठी गर्लफ्रेंडला गोव्याला फिरायला घेऊन गेलेल्या चोरट्याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शहवान शेख (३३) असे या चोरट्याचे नाव असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक यंत्रणांच्या मदतीने अवघ्या तीन दिवसांत त्याला अटक केली.

नेरळच्या राजेंद्र गुरुनागरमधील अंबिका अपार्टमेंटमध्ये २ सप्टेंबर रोजी घरफोडी झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असता त्यांना घराच्या कपाटातील ७ तोळे सोन्याचे दागिने व सहा लाख रुपये रोख रक्कम लांबवल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पोलिसांना घटनास्थळावरून लोखंडी रॉडही सापडला. त्यानुसार कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या पथकाने चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही व डॉग स्कॉडच्या मदतीने चोरट्याचा शोध सुरू केला.

सीसीटीव्हीच्या मदतीने मागोवा घेतला

चोरट्याविरोधात कोणताही पुरावा नसतानाही पथकाने शिताफीने तपास करत बस डेपो, रेल्वे स्टेशन रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासले. दरम्यान चोरट्याची ओळख पटली. त्याच्यासोबत एक तरुणीही असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने मागोवा घेत थेट गोवा गाठला आणि गर्लफ्रेंडसोबत बीचवर फिरणाऱ्या शहवानला जेरबंद केले.

Comments are closed.