टक्केवारी, राजकीय हस्तक्षेपामुळेच मुंबई-गोवा महामार्ग रखडला! राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
सध्या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. नवीन रस्ते बनवण्यापूर्वी सरकारने जागेचे भूसंपादन केलेलं नाही. कंत्राटदाराला कंत्राट देऊन ते मोकळे झालेत. पैसेही गेलेत आणि त्यातून त्यांचे टक्केही गेलेले आहेत… पण रस्ता मात्र तिथेच आहे. कारण आपण राज्य म्हणून विचार न करता यातून टक्के किती मिळतील याचा विचार करतो आणि त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडलेला आहे, अशी घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे सध्या रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, माणगाव येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विकासकामे, मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे, कोकणातील भूमीपुत्रांचे प्रश्न आणि येऊ घातलेल्या ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पावरून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
आज ९ ऑगस्ट २०२६ रोजी रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधला.
• राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. मागे नितीन गडकरींनी मला सांगितलं होतं कंत्राटदार कंटाळून निघून गेले म्हणून हे काम रखडलं आहे. पण ते कंत्राटदार का कंटाळले… pic.twitter.com/emhgDxRj01
— Raj Thackeray (@RajThackeray) August 9, 2026
माणगावमध्ये माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर तीव्र संताप व्यक्त केला. राजकीय हस्तक्षेपामुळे मुंबई-गोवा महामार्ग रखडला असल्याचा गंभीर आरोप यावेळी त्यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी यापूर्वी कंत्राटदार कंटाळून निघून गेल्याचे सांगितले होते, याची आठवण करून देत राज ठाकरे म्हणाले की, कंत्राटदार का कंटाळले, याचा विचार केला पाहिजे. आपल्याकडे प्रत्यक्ष कामापेक्षा टक्केवारीचा विचार जास्त होतो, म्हणूनच कंत्राटदार वैतागून निघून जातात. दरवर्षी गणेशोत्सवात किंवा सणासुदीला चाकरमानी याच महामार्गावर ट्रॅफिकमध्ये अडकतात, हे चित्र अत्यंत दुर्दैवी असल्याची खंत राज ठाकरे यांनी बोलून दाखवली.
दरम्यान कोकणातील विकासाच्या मॉडेलवरही राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, विकासकामांना आमचा अजिबात विरोध नाही, मात्र कोकणातील सध्याची परिस्थिती पाहता असा विकास नको, अशी भावना निर्माण होते. आमच्या जमिनी, आमचं पाणी आणि आमची वीज यावर जर बाहेरचे लोक पोसले जाणार असतील, तर अशा विकासाचा काय उपयोग? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकार नावाची जी गोष्ट असते त्या सरकारने आपल्या लोकांचं हित पहायचं असतं. जनतेच्या हितापेक्षा मंत्र्यांचे आपापसातील वाद आणि पालकमंत्रीपदासाठी चाललेली रस्सीखेच ही अतिशय क्षुल्लक बाब आहे. सरकारने लोकांचे हित पाहणे हीच त्यांची पहिली जबाबदारी असते, असे म्हणत सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
तिसऱ्या मुंबईच्या विकासासाठी 324 चौ. किमीचा ‘मास्टर प्लॅन राज्य सरकारने निश्चित केला आहे. याच तिसऱ्या मुंबईच्या प्रकरल्पाबाबत बोलताना राज ठाकरे यांनी गंभीर बाबींवर लक्ष केंद्रीत केलं. या प्रकल्पाबाबत स्थानिकांना कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. स्थानिक तरुण-तरुणी या बदलासाठी मानसिकरीत्या तयार आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला. बाहेरच्या राज्यांतील तरुण महाराष्ट्रात काय घडणार आहे याची पूर्ण तयारी करून येतात, तर आपले भूमिपुत्र मात्र या सर्व प्रक्रियेत अंधारातच राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोकणातील जनतेला मोलाचा सल्ला देताना राज ठाकरे म्हणाले की, माणसाचे अस्तित्व त्याच्या पायाखालच्या जमिनीवर अवलंबून असते. जेव्हा तुम्ही तुमची जमीन विकता, तेव्हा तुमची पुढची पिढी आणि तुमचे मूळ अस्तित्व संपून जाते, असा इशारा राज ठाकरे यांनी जनतेला दिला.
Comments are closed.