दिल्ली विधानसभेत सुरक्षा पोकळी – तरुण भारत
बॅरिकेड्स-गेट तोडून भरधाव कारचा आवारात प्रवेश : फरार चालकासह तिघे जाळ्यात : सुरक्षेतील त्रुटी चव्हाट्यावर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा परिसरात सोमवारी दुपारी सुरक्षेत मोठी त्रुटी आढळली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ‘उत्तर प्रदेश’ (युपी) नोंदणी क्रमांक असलेल्या एका कारने व्हीआयपी प्रवेशद्वार असलेल्या ‘गेट क्रमांक 2’चा अडथळा तोडून प्रवेश केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चालकाने केवळ आत प्रवेशच केला नाही, तर सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देऊन गाडीसह घटनास्थळावरून पळही काढला. या घटनेनंतर दिल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर गाडीचा शोध सुरू केल्यानंतर काही तासांमध्येच चालकासह तिघांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे दिल्लीतील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
राष्ट्रीय राजधानीतील सर्वात सुरक्षित भागांपैकी एक असलेल्या दिल्ली विधानसभेतील सुरक्षा व्यवस्थेतील एक मोठी त्रुटी सोमवारी दुपारी उघड झाली. एका अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या कारने गेट तोडून आवारात प्रवेश केला. दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. याप्रसंगी मास्कधारी चालकाने थेट विधानसभा अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्या कार्यालयाकडे गाडी नेत व्हरांड्याजवळ पुष्पगुच्छ ठेवला आणि गाडी घेऊन पळ काढला. अधिकारी या घटनेला संभाव्य सुरक्षा त्रुटी मानत आहेत. विधानसभेला अलीकडेच बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या.
दिल्ली विधानसभेतील सुरक्षा उल्लंघनप्रकरणी पोलिसांनी काही तासांतच चालकासह तीन संशयितांना अटक केली. तसेच टाटा सिएरा कारही जप्त करण्यात आली. पोलिसांच्या तपासात सरबजीत सिंग हा इसम वाहन चालवत असल्याचे उघड झाले. ही कार रुपनगर परिसरातून जप्त करण्यात आली. गाडीतील इतर दोन व्यक्तींच्या भूमिकेची पडताळणी केली जात आहे. दरम्यान, दिल्ली पोलीस आयुक्त सतीश गोलचा हेदेखील दिल्ली विधानसभेत दाखल असून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली.
कोणतेही स्फोटक आढळले नाही
आरोपी चालक आपल्या कारमधून फुलांचा पुष्पगुच्छ घेऊन आला होता. त्याने दिल्ली विधानसभेच्या गेट क्रमांक 2 वरील बॅरिकेड्स तोडून विधानसभेच्या आवारात प्रवेश करत पुष्पगुच्छ आत ठेवून पलायन केले. दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी पुष्पगुच्छाची तपासणी केली. पोलिसांच्या तपासात पुष्पगुच्छात कोणतेही बॉम्ब, स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळल्या नाहीत. पुष्पगुच्छात स्फोटकासारखा पदार्थ असू शकतो, असा पोलिसांना संशय होता. मात्र, स्फोटके नसल्याने सुटकेचा नि:श्वास टाकण्यात आला.
‘गेट क्रमांक 2’वर घटना
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभेच्या गेट क्रमांक 2 वर एक भरधाव वेगाने येणारी गाडी अचानक आली. तेथे तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी काही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच कारने गेटला धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की गेटचा अडथळा तुटला आणि कार विधानसभेच्या आवारात घुसली. ही घटना विधानसभा संकुलाच्या गेट क्रमांक 2 वर घडली. आता गेट क्रमांक 2 वर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
कारवरील नंबरप्लेट ‘युपी’ नोंदणीची
प्राथमिक माहितीनुसार, कारवर उत्तर प्रदेशची नंबरप्लेट आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस कार आणि तिच्या चालकाचा शोध घेत आहेत. तथापि, ही घटना मोठ्या कटाचा भाग होती की चालक दारूच्या नशेत असल्यामुळे किंवा नियंत्रण सुटल्यामुळे घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून कारचालकाचा शोध सुरू असून विविध पथके संशयिताच्या शोधार्थ रवाना झाली आहेत.
यापूर्वी संसदेतील सुरक्षेतही त्रुटी
दिल्लीत यापूर्वी संसदेतील सुरक्षेतील एक त्रुटी उघडकीस आली होती. ही घटना 13 डिसेंबर 2023 रोजी घडल्यानंतर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. लोकसभेच्या कामकाजादरम्यान, सागर शर्मा आणि मनोरंजन डी नावाचे दोन तरुण अचानक प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात घुसले आणि खासदारांच्या बाकांकडे धावू लागले. त्यांनी आपल्या बुटांमध्ये लपवलेले रंगीत धुराचे डबे बाहेर काढल्यामुळे संपूर्ण सभागृहात पिवळा धूर पसरल्याने घबराट पसरली होती. सभागृहातील खासदारांनी धैर्याने त्यांना पकडल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी, संसद परिसराबाहेर, नीलम आणि अमोल शिंदे या इतर दोन आंदोलकांनी रंगीत धूर सोडला आणि घोषणाबाजी केली. या संपूर्ण कटाचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या ललित झा याने या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते
Comments are closed.