देशातील पहिल्या एलएनजी ट्रेनला हिरवा झेंडा – TMarathiNews

अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्घाटन : पेट्रोल-सीएनजी सारखी प्रणाली : इंधनावरील खर्चाची बचत होणार

वृत्तसंस्था/ साबरमती

भारतीय रेल्वेच्या इतिहासात रविवारी एका नव्या अध्यायाची भर पडली. जिंद ते सोनीपत मार्गावर धावणाऱ्या हायड्रोजन ट्रेननंतर आता एलएनजीवर (द्रवीकृत नैसर्गिक वायू) चालणारी ट्रेन सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी साबरमती स्थानकावरून देशातील पहिल्या एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) वर चालणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही ट्रेन ड्युअल-फ्यूएल तंत्रज्ञानाचा वापर करून धावेल. ज्याप्रमाणे सीएनजी कार पेट्रोल आणि सीएनजीवर चालतात त्याचप्रमाणे ही ट्रेन डिझेल आणि एलएनजीवर चालू शकणार आहे. देशात एलएनजीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्यामुळे भविष्यात ते ट्रेनसाठी एक स्वस्त इंधन ठरू शकते. या ट्रेनचे भाडे सामान्य प्रवासी ट्रेनइतकेच असणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी गुजरातमध्ये 1,542 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले. याप्रसंगी त्यांनी कवच प्रणाली आणि साबरमती-सरखेज दुहेरी ब्रॉडगेज रेल्वेमार्गाच्या जोडणीचेही उद्घाटन केले. अहमदाबाद रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, राष्ट्रीय वाहतूकदार रेल्वे ट्रेनच्या ड्रायव्हिंग पॉवर कारमध्ये (डीपीसी) प्रथमच एलएनजी इंधन प्रणालीचा वापर करत आहे. नवीन डीएफसी तंत्रज्ञानामुळे एकच इंजिन एलएनजी आणि डिझेल या दोन्हीवर चालू शकते. या ट्रेनचे महत्त्वाचे वैशिष्ट्या म्हणजे ती एका पूर्ण भरलेल्या टाकीवर 2,200 किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते.

क्षेत्रीय चाचण्या यशस्वी

या प्रकल्पांतर्गत 1,400 एचपी क्षमतेच्या दोन ड्रायव्हिंग पॉवर कार (डीपीसी) एलएनजी ड्युअल-फ्यूएल प्रणालीमध्ये रुपांतरित करण्यात आल्या आहेत. ट्रेनच्या 2,000 किलोमीटरहून अधिक यशस्वी क्षेत्रीय चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ही ट्रेन गुजरातमधील मेहसाणा आणि साबरमती दरम्यान सुमारे आठ महिने धावली. भविष्यात आणखी आठ ते दहा ट्रेन्समध्ये एलएनजी तंत्रज्ञान अवलंबण्याची योजना आहे.

प्रदूषणही कमी होणार : डीआरएम

एलएनजी डिझेलपेक्षा स्वस्त असल्याने ट्रेन चालवण्याचा एकूण खर्च कमी होणार आहे. तसेच एलएनजी इंधनामुळे प्रदूषणही लक्षणीयरीत्या कमी होईल. यामुळे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि धुळीचे कण यांसारख्या हानिकारक पदार्थांची निर्मिती कमी झाल्यामुळे रेल्वे रुळांच्या सभोवतालची हवाही स्वच्छ राहील, असे अहमदाबादचे डीआरएम वेद प्रकाश यांनी स्पष्ट केले . याव्यतिरिक्त इंधनाच्या खर्चात मोठी बचत होईल. एलएनजी इंधन प्रणालीमुळे इंजिनच्या शक्तीत कोणतीही घट होत नाही. इंजिनची शक्ती डिझेल इंजिनइतकीच राहते. एका एलएनजी टाकीमुळे डीपीसी ट्रेन अंदाजे 2,200 किलोमीटर धावणार असल्यामुळे वारंवार इंधन भरण्याची गरज भासत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

दुहेरी-इंधन प्रणाली

ही ट्रेन पूर्णपणे एलएनजीवर अवलंबून राहणार नाही. तिचे इंजिन एलएनजी आणि डिझेल या दोन्हीवर चालणार असल्यामुळे ही एक दुहेरी-इंधन प्रणाली बनते. इंधनाच्या उपलब्धतेनुसार, इंजिन एलएनजी आणि डिझेलमध्ये अदलाबदल करू शकते. अर्थात एलएनजी उपलब्ध नसतानाही ट्रेन चालू राहू शकते. आणखी एक फायदा म्हणजे एलएनजीमुळे ट्रेनला इंधन भरण्यापूर्वी जास्त अंतर कापता येते.

…………….

Comments are closed.